Karisma Kapoor viral video: करीश्मा कपूर अनेकदा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. तिचा एक्स पती संजय कपूरचे निधन झाल्यानंतर ती मोठ्या चर्चेत आली होती. त्यानंतर जेव्हा संजय कपूरच्या संपत्तीचा वाद निर्माण झाला, तेव्हाही ती व तिची मुले चर्चांचा भाग झाली होती. आता मात्र, करीश्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इंडियाज बेस्ट डान्सरचे पाचवे पर्व लवकरच सुरू होणार आहे. या पर्वात करीश्मा परीक्षक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गीता कपूर, जावेद जाफरी आणि टेरेन्स लेवीस यांच्याबरोबर ती या रिअॅलिटी शोमध्ये जज असणार आहे. आता या सेटवरील तिचा एक व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

करीश्मा कपूरचा ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये करीश्मा पापाराझींबरोबर बोलत असल्याचे दिसते. ती त्यांना शांतपणे म्हणते, “चेहऱ्यावर जास्त झूम करू नका”, त्यानंतर ती हसताना दिसते. तिथे गीता कपूर व इतर कलाकारही दिसत आहे.

आता करीश्मा कपूरच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी असेही लिहिले आहे की या गोष्टी सांगाव्या लागतात ही दु:खद गोष्ट आहे. पापाराझींनी या गोष्टींची काळजी घेतले पाहिजे असेही अनेकांनी मत व्यक्त केले आहे. एकाने लिहिले की दोन मुलांची आई, एक यशस्वी अभिनेत्री, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका स्त्रीला सभ्यपणे वागण्याची विनंती करावी लागते.

या घटनेमुळे पुन्हा एकदा सेलिब्रिटी आणि पापाराझी यांच्यातील संबंध, तसेच सार्वजनिक ठिकाणी मर्यादा पाळणे आणि आदराने संवाद साधणे यावर चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. एखाद्या सेलिब्रिटीने पापाराझींना त्यांच्या वागण्याबद्दल बोलल्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी श्रुती हासन, रणबीर कपूर, जया बच्चन, सलमान खान, सैफ अली खान, सनी देओल यांसह अनेक कलाकारांनी पापाराझींच्या वागण्याबद्दल वक्तव्य केले आहे. तसेच, अनेक कलाकारा पापाराझींवर संतापलेले देखील पाहायला मिळाले आहेत.

करीश्मा कपूरबद्दल बोलायचे तर तिने हिंदी सिनेमांमध्ये प्रामुख्याने काम केले आहे. ९० च्या दशकातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून तिची ओळख होती. तसेच, तिला तिच्या कामासाठी राष्ट्रीय पुरस्कार आणि चार फिल्मफेअर पुरस्कारांनी गौरविले आहे.

दरम्यान, करीश्मा जज म्हणून काम करणार असलेला इंडियाज बेस्ट डान्सरचे पाचवे पर्व ९ मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.