बॉलीवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित तिच्या सहज सुंदर अभिनयासाठी आणि सौंदर्यासाठी ओळखली जातेच, पण तिने तिच्या नृत्यानेही अनेकांची मनं जिंकली आहेत. तिच्या अभिनयाइतकंच तिच्या नृत्याचंही कौतुक झालं आहे. त्यामुळे माधुरी दीक्षितबरोबर एकत्र नृत्य करणं हे आजही अनेक अभिनेत्रीसाठी आव्हान ठरू शकतं. पण, १९९७मध्ये आलेल्या ‘दिल तो पागल है’ या चित्रपटात माधुरीबरोबर नृत्य करण्याचं आव्हान अभिनेत्री करिश्मा कपूरने स्वीकारलं होतं.

करिश्मा आणि माधुरी दोघीही बॉलीवूडमधील ९०च्या काळातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. दोघींनी आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत आणि दोघींचाही मोठा चाहतावर्ग आहे. तर दोघीही आजही इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. पण, नृत्याच्या बाबतीत माधुरीचा हात धरणं हे सगळ्यांना शक्य नव्हतं. म्हणून यश चोप्रा दिग्दर्शित या चित्रपटात माधुरीबरोबर डान्स करण्यासाठी कोणतीही अभिनेत्री तयार नव्हती. पण, करिश्मा कपूरने मात्र हे आव्हान स्वीकारलं होत. अशातच आता तिने याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

माधुरीबरोबर कोणालाच स्पर्धा करायची नव्हती – करिश्मा

इंडिया टुडेशी संवाद साधताना करिश्मा कपूर याबद्दल म्हणाली, “जेव्हा दिल तो पागल है चित्रपट बनत होता तेव्हा कोणत्याही अभिनेत्रीला माधुरीच्या विरुद्ध भूमिका साकारायची नव्हती. कोणालाही तिच्याबरोबर नृत्य करुन तिच्याबरोबर स्पर्धा करायची नव्हती.”

करिश्मा पुढे चित्रपटातील तिच्या निशा या पात्राबद्दल म्हणाली, “निशाच्या पात्रामुळे सिनेमा बदलला. ती नायिका होती पण ती अशी नायिका होती जिच्या प्रेमात नायक कधीच पडत नाही. ज्याने तिला नाकारलेलं असतं आणि प्रेक्षकांचा तिचा त्रास जाणवला. माझ्यासाठी ती भूमिका साकारणं खूप कठीण होतं. आजही त्याबद्दल विचार केल्यानतंर माझ्या अंगावर शहारे येतात.”

अलीकडेच ‘डान्स इंडिया डान्स सीझन ५’ या कार्यक्रमात माधुरी तिच्या ‘मां बहन’ या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी गेली असताना तिथे परिक्षक म्हणून उपस्थित असलेल्या करिश्माबरोबर तिने ‘दिल तो पागल है’मधील ‘ले गई’ या गाण्यावर डान्स केला. दोघींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. दोन दशकाहून अधिक काळानंतर दोघी एकत्र या गाण्यावर पुन्हा थिरकल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनीही या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला.