बॉलीवूड विश्वात असे अनेक कलाकार आहेत जे प्रसिद्धीच्या शिखरावर असताना अचानक गायब झाले. ‘कर्ज’ आणि ‘अर्थ’ सारख्या १०० हून जास्त सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करणारे दिग्गज अभिनेते राज किरण (Raj Kiran) हे २००३ सालापासून बेपत्ता आहेत. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ त्यांचा शोध सुरू आहे, मात्र अद्याप त्यांचे रहस्य उलगडलेले नाही. राज किरण यांच्या दोन्ही मुली ऋषिका महतानी आणि मन्नत महतानी यांनी वडिलांच्या आठवणी जपत आपापल्या आयुष्यात यश मिळवले आहे. ऋषिकाने प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर रवी शाह यांच्याशी लग्न केले असून, रॅपर ड्रेकसारखे आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी त्यांचे दागिने वापरतात. दुसरीकडे, राज किरण परत येण्याची वाट पाहून थकलेल्या त्यांच्या पत्नीने अखेर दुसरं लग्न केलं आहे.

ऋषिकाने ज्वेलरी व्यवसायात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर रवी शाह यांच्याशी लग्न केलंय. रवी यांनी डिझाइन केलेले दागिने रॅपर ड्रेकसह अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी घातले आहेत. ऋषिका आणि रवी यांच्या लग्नाला १२ वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे. आयुष्य पुढे सरकलं असलं तरी ऋषिका वडिलांबद्दल सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करत असते. ऋषिका व रवी यांना एक मुलगी आहे. तर दुसरीकडे, राज किरण यांची लहान मुलगी मन्नत हिचं २०२० मध्ये लग्न झालं. तीदेखील सुखाने संसार करतेय. राज किरण परत येतील, अशी बरीच वर्षे वाट पाहिल्यानंतर त्यांच्या पत्नीनेही दुसरं लग्न केलं.

राज किरण नक्की कुठे आहेत?

राज किरण यांनी १९७५ मध्ये बी. आर. इशारा यांच्या ‘कागज की नाव’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. पुढील दोन दशकांत त्यांनी अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केलं आणि आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. १९८० मध्ये आलेल्या ‘कर्ज’ या चित्रपटात ऋषी कपूर यांच्याबरोबर काम केल्यानंतर त्यांना ओळख मिळाली. १९८२ मधील ‘अर्थ’ चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. १९९० च्या दशकात त्यांना चित्रपटांच्या ऑफर्स मिळणं कमी झालं आणि हळूहळू राज किरण इंडस्ट्रीपासून दुरावले.

राज किरण यांना अटक झाल्याचे अहवाल

‘डेक्कन हेराल्ड’च्या एका अहवालानुसार, राज किरण यांनी सत्य साई बाबा यांच्या पुट्टपर्थी आश्रमात बेकायदेशीरपणे घुसण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे त्यांना एकदा ताब्यात घेऊन बंगळुरू मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. रात्री आश्रमात प्रवेश करण्यासाठी त्यांनी एक ट्रॅक्टर आणि शिडी भाड्याने घेतली होती, असा दावा या अहवालात करण्यात आला होता. त्या काळातील काही अहवालांनुसार, राज किरण नंतर काही काळ अमेरिकेत त्यांचे भाऊ गोविंदबरोबर राहिले होते.

Missing actor Raj Kiran family
बेपत्ता अभिनेते राज किरण (फोटो- एक्सप्रेस आर्काइव्ह)

महेश भट्ट यांनी राज किरण मुंबईत भेटल्याचा केला होता दावा

महेश भट्ट यांनी दावा केला होता की, काही वर्षांनंतर ते राज किरण यांना मुंबईतील मसिना हॉस्पिटलमध्ये भेटले होते, तिथे त्यांच्यावर मानसिक आजारासंदर्भात सुरू होते. “अनेक वर्षांपूर्वी जेव्हा राज किरण मसिना हॉस्पिटलच्या सायक्याट्रिक वार्डात दाखल होते, तेव्हा खूप शांत आणि नैराश्यात दिसत होते. ते बोलूही शकत नव्हते. त्यांच्यात आधीसारखा उत्साह आणि ऊर्जा काहीच उरलं नव्हतं,” असं महेश भट्ट यांनी सांगितलं होतं. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर महेश भट्ट यांनी राज किरण यांना काम मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता. पण कोणीही त्यांच्याबरोबर काम करायला तयार नव्हतं. त्यानंतर राज किरण अमेरिकेला भावाजवळ निघून गेले.

ऋषी कपूर यांनी राज किरण यांच्या भावाशी केलेला संपर्क

काही वर्षांनंतर राज किरण बेपत्ता झाल्याच्या बातम्या समोर आल्या. २०११ मध्ये अभिनेते ऋषी कपूर जेव्हा अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते, तेव्हा त्यांनी आपल्या ‘कर्ज’ चित्रपटातील सहकलाकाराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी राज किरण यांचे भाऊ गोविंद यांच्याशी संपर्क साधला. “गोविंद यांनी मला ‘राज जिवंत आहे’ असं सांगितल्यावर मला बरं वाटलं. पण आरोग्याच्या समस्यांमुळे त्यांना अटलांटा (अमेरिका) येथील एका संस्थेत ठेवण्यात आलं होतं. राज करण त्यांच्या उपचारांचा खर्च भागवण्यासाठी त्याच संस्थेत काम करत होते आणि अभिनय करताना केलेल्या गुंतवणुकीमुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बरी होती,” असं ऋषी कपूर म्हणाले होते. मात्र राज किरण यांची मुलगी ऋषिका हिने सर्व दावे फेटाळून लावले होते.

राज किरण यांच्या मुलीने फेटाळलेले सर्व दावे

“ते अटलांटामध्ये नाहीत. आम्ही गेल्या ८ वर्षांपेक्षा जास्त काळापासून त्यांचा शोध घेत आहोत. त्यांना शोधण्यासाठी आम्ही न्यू यॉर्क पोलीस आणि खासगी गुप्तहेरांची मदतही घेतली, पण ते कुठेही सापडलेले नाहीत. ते एक अत्यंत प्रेमळ वडील होते. बेपत्ता होण्यापूर्वी त्यांना मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या होत्या आणि आम्हाला हा विषय कौटुंबिक आणि खासगी ठेवायचा होता, पण अशा खोट्या बातम्यांमुळे मला उघडपणे बोलावे लागलं. त्यांच्याबद्दलची अशी वक्तव्ये म्हणजे माझ्या आईवर अन्याय आहे,” असं ऋषिका म्हणाली होती.

२३ वर्षे उलटूनही राज किरण सापडले नाहीत…

या सगळ्या चर्चांनंतर तत्कालीन विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी दावा केला होता की राज किरण हे अमेरिकेतील एका मानसिक आरोग्याशी संंबंधित काम करणाऱ्या संस्थेत सापडले आहेत. त्यांनी भारत सरकार आणि फिल्म इंडस्ट्रीला त्यांना परत आणण्यासाठी मदत करण्याचं आवाहनही केलं होतं. मात्र, पुढे त्याबद्दल काहीच माहिती मिळाली नाही. इतक्या वर्षांमध्ये इतक्या चर्चा होऊनही राज किरण यांच्याबद्दल काहीच सत्य समजू शकलेलं नाही. राज किरण बेपत्ता होऊन दोन दशकांहून अधिक काळ लोटला आहे, तरीही राज किरण नक्की कुठे आहेत हे रहस्य तसंच आहे. ‘वीराना’ चित्रपटातील अभिनेत्री जास्मिन धुन्नाप्रमाणेच, राज किरण यांचं अचानक गायब होणं हेदेखील बॉलीवूडमधील सर्वात मोठ्या न उलगडलेल्या रहस्यांपैकी एक आहे.