Kashmera Shah on Shahrukh Khan’s Yes Boss Movie: हिंदी सिनेमे व रिअॅलिटी शो यांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी, प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणून कश्मीरा शाहला ओळखले जाते.

कश्मीरा शाहने नुकतीच भारती सिंग व हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत तिने तिच्या आयुष्यातील चढ-उतारांबद्दल सांगितले. तसेच, करिअरमधील कठीण काळाबद्दल तिने वक्तव्य केले. तसेच, शाहरुख खानच्या येस बॉस सिनेमात काम करण्याचा तिने अनुभवही सांगितला. ती नेमकं काय म्हणाली आहे, हे जाणून घेऊ…

“मला त्या चित्रपटातील भूमिकेसाठी…”

कश्मीरा म्हणाली, “मी येस बॉस चित्रपटात काम करत आहे, हे मी माझ्या आईला सांगितलं नव्हतं. मी तिला थेट चित्रपट पाहायला घेऊन गेले. मला मेकअपशिवाय कोणी ओळखत नसे. त्यावेळी माझ्याकडे पैसे नसायचे.”

अभिनेत्री पुढे म्हणाली, “मला त्या चित्रपटातील भूमिकेसाठी ३० हजार रुपये दिले होते. त्यावेळी माझे काम मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते. माझ्याकडे कार नव्हती. त्या भूमिकेसाठी निक्की अनेजाची निवड झाली होती. मात्र, ती इतर कामात व्यग्र असल्याने तिने तो चित्रपट सोडला. तिला सिनेमात काम करायचे नव्हते. त्यावेळी तिचे लग्न झाले, असे मला वाटते.”

येस बॉस सिनेमातील भूमिकेबद्दल अभिनेत्री पुढे म्हणाली, “चित्रपटात मला एका श्रीमंत महिलेची भूमिका साकारायची होती. पण, खऱ्या आयुष्यात त्यावेळी माझ्या ना पैसे होते, ना कार होती. माझे मित्रही त्यावेळी श्रीमंत नव्हते. पण, मला त्या कामाची, भूमिकेची गरज होती. मला त्यावेळी शूटिंगसाठी सकाळी ९ वाजता बोलावले तर मी सातलाच जायचे. मी रिक्शातून सेटवर जाते, हे कोणाला कळू यासाठी मी लवकर सेटवर जायचे. शाहरुख खान, जुही चावला, आदित्य पांचोली हे सगळे कलाकार त्यांच्या मोठ्या गाडीतून येत असत.”

येस बॉस हा कश्मीरा शाहचा पहिला हिंदी चित्रपट होता. त्यानंतर तिने काजोल अजय देवगण यांच्या प्यार तो होना ही था या सिनेमात काम केले. तसेच, हेरा फेरी, जंगल या सिनेमातील तिच्या भूमिकांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. दिल पे मत ले यार, वास्तव: द रिअॅलिटी,आँखे या सिनेमात देखील अभिनेत्री महत्वाच्या भूमिकेत दिसली.

कश्मीरा शाहने फक्त चित्रपटातच काम केले असे नाही. तर ती काही रिअॅलिटी शोमध्येदेखील दिसली. बिग बॉस १, नच बलिये ३, खतरों के खिलाडी ४ अशा शोंमध्येदेखील कश्मीरा दिसली. सध्या ती लाफ्टर शेफ या शोमध्ये दिसत आहे. या शोमध्ये तिच्याबरोबर तिचा पती कॉमेडियन कृष्णा अभिषेक, समर्थ जुरैल, अंकिता लोखंडे, विकी जैन, अली गोनी, जन्नत जुबेर असे अनेक लोकप्रिय कलाकार सहभागी झाले आहेत. त्यांना विविध पदार्थ बनवायला सांगितले जातात. तसेच, या शोमध्ये स्पर्धक टास्क पूर्ण करण्याबरोबरच प्रेक्षकांना खळखळून हसवताना दिसतात.