Kashmera Shah Govinda Controversy : बॉलीवूड अभिनेता गोविंदा हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. तो सहकलाकार कोमल राणी स्वर्णकारबरोबर अनेकदा एकत्र दिसत असल्याने पत्नी सुनीता आहुजा यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे गोविंदा व सुनीता यांचे वैवाहिक नाते चर्चेत असताना, गोविंदाचा भाचा कृष्णा अभिषेक व त्याची पत्नी कश्मीरा शाहने सुनीता यांना पाठिंबा दिला. आता पुन्हा एकदा कश्मीराने गोविंदाला टोला लगावला आहे.

कश्मीरा शाह ही नुकतीच मुंबई एअरपोर्टवर दिसून आली. यावेळी पापाराझींनी तिला तिच्या ट्रिपबद्दल विचारले. तेव्हा कश्मीराने फिरण्यासाठी नाही, तर कामानिमित्त बाहेर जात असल्याचे सांगितले. कश्मीरा म्हणाली, “मी एका नवीन प्रोजेक्टसाठी युरोप, ग्रीसला जात आहे. हा एक स्वतंत्र प्रोजेक्ट असून, त्यावर मी एक अभिनेत्री व दिग्दर्शक म्हणून काम करणार आहे.”

पतीने किंवा माझ्या बॉयफ्रेंडने पैसे गुंतवलेले नाहीत – कश्मीरा शाह

पुढे कश्मीराने, “पण खरंच आनंद आहे की, नव्या प्रोजेक्टवर काम करीत आहे. हा माझा वैयक्तिक प्रोजेक्ट असून, त्यासाठी माझ्या पतीने किंवा माझ्या बॉयफ्रेंडने पैसे गुंतवलेले नाहीत. मी घरातील सिनेमांमध्ये नाही तर बाहेरच्या सिनेमांमध्ये काम करते,” अशी हसून प्रतिक्रिया दिली. त्यानंतर तिने अप्रत्यक्षपणे कोमल राणी स्वर्णकारवर टीका केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

नेटकऱ्यांनी कश्मीराच्या या वक्तव्यावर कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले, “ज्या पद्धतीनं कश्मीरा सुनीता यांच्या पाठीशी उभी आहे, ते खूप कौतुकास्पद आहे.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, “कश्मीरा एक सक्षम स्त्री असून, नेहमी स्पष्टपणे बोलते.” तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “अशी एक व्यक्ती आयुष्यामध्ये कायम पाहिजे.”

दरम्यान, गोविंदाने कोमल राणी स्वर्णकारसह लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्याने या वादाला सुरुवात झाली. एकाच दिवशी गोविंदा व सुनीता यांनी वेगवेगळे दर्शन घेतले होते. त्यानंतर सुनीता यांनी, प्राण्यांना जीव लावा. ते तरी प्रामाणिक असतात, असे म्हणत स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यावरून कोमल राणीनेसुद्धा सुनीताला आपल्या पतीला मारण्याचा प्रयत्न करणारी, असे म्हटल्यानंतर कश्मीरा शाहने कठोर शब्दांत खडेबोल सुनावले होते.