Kashmera Shah Support Sunita Ahuja amidst Govinda and Komal Rani Swarnkar : बॉलीवूड अभिनेता गोविंदाने त्याची सहकलाकार कोमल राणी स्वर्णकारबरोबर लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावर गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केल्यानंतर कोमल राणी स्वर्णकारने प्रतिक्रिया दिली. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत तिने सुनीता यांच्यावर गंभीर आरोप केले. यावर आता गोविंदाचा भाचा कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मीरा शाहने पलटवार करुन तिला प्रत्युत्तर दिले आहे.
इन्स्टाग्रामवर पोस्ट करीत कश्मीरा शाहने लिहिले, “माझ्या ३० वर्षांच्या करिअरमध्ये आणि ५० चित्रपटांच्या या प्रवासामध्ये माझ्या एकाही सहकलाकाराला माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जास्त काहीच माहीत नाही. माझ्या भावनांबद्दल त्यांना माहीत नाही. मी माझ्या भावना फक्त एकाच व्यक्तीसमोर व्यक्त केल्या आणि नंतर त्याच्याशी लग्न केलं आणि तो म्हणजे कृष्णा.”
आम्हाला खुनी म्हणण्याची ही पहिलीच वेळ – कश्मीरा
पुढे तिने लिहिले, “कामाच्या ठिकाणी एखाद्या सहकाऱ्याला एखाद्याच्या आयुष्यातील इतक्या सगळ्या खासगी गोष्टी माहीत असणं, त्यातून असं नातं निर्माण व्हावं, असं मी कधीच ऐकलं नाही. मला माहीत आहे की, मी एक खंबीर स्त्री आहे आणि मी अशा कुटुंबात लग्न करून आले आहे, जिथे स्त्रिया खंबीर आहेत. आम्ही आमच्या कुटुंबाची काळजी घेतो म्हणून आम्हाला अनेकदा उद्धट, त्रासदायक, वर्चस्व गाजवणाऱ्या, फक्त स्वतःच्या ध्येयावर लक्ष देणाऱ्या किंवा स्वार्थी म्हटले जाते; पण आम्हाला ‘खुनी’ म्हणण्याची ही पहिलीच वेळ आहे.”
पुढे कश्मीराने लिहिले, “जर एखाद्या स्त्री, मग ती आई, पत्नी, बहीण किंवा काकू कोणीही असो आपल्या प्रिय व्यक्तीचे मग ते वडील, पती किंवा भाऊ असोत किंवा अगदी श्वान असो, रक्षण केलं म्हणून त्यांना ‘खुनी’ म्हटलं जात असेल, तर तसंही का असेना. सुनीता आहुजा, तुम्ही एक खूप खंबीर स्त्री आहात, याचा मला खूप अभिमान आहे आणि मी कायम तुमच्या पाठीशी उभी राहीन.”
