Vicky Kaushal-Katrina Kaif Announce Baby Boy Name : विकी कौशल व कतरिना कैफ ७ नोव्हेंबर २०२५ रोजी आई-बाबा झाले. बाळाच्या जन्मानंतर बरोबर दोन महिन्यांनी बॉलीवूडच्या या स्टारकपलने मुलाचं नाव जाहीर केलं आहे. विकी-कतरिना आपल्या मुलाचं नाव काय ठेवणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत त्यांच्या बाळाचं गोड नाव सर्वांना सांगितलं आहे.
कतरिना कैफ व विकी कौशल यांनी त्यांच्या मुलाचं नाव ठेवलंय विहान कौशल ( Vihaan Kaushal ). अभिनेत्री ही पोस्ट शेअर करत लिहिते, “आमचा लाडका विहान कौशल…प्रार्थनांना यश मिळालं, त्याच्या येण्याने जीवन सुंदर झालं…आमचं संपूर्ण जग एक क्षणात बदललं. मी फक्त कृतज्ञता व्यक्त करेन!”
विहान हे संस्कृत नाव असून याचा अर्थ पहाट, सूर्योदय किंवा सकाळचा प्रकाश असा होतो. एका नव्या प्रवासाची किंवा युगाची सुरुवात असाही अर्थ या नावाचा घेतला जातो. विकी-कतरिनाने बाळाचं नाव जाहीर करताच नेटकऱ्यांनी या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
विकीच्या चित्रपटाशी खास कनेक्शन
विकीने २०१९ मध्ये ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’ ( Uri ) या सिनेमात प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकेचं नाव सुद्धा विहान होतं. विकीने मेजर विहान सिंह शेरगिल ही भूमिका साकारली होती.
“किती गोड नाव आहे”, “सुंदर नाव”, “विकीचं उरीमध्ये विहान नाव होतं”, “विहान म्हणजे नवीन सुरुवात”, “खूप विचार करून नाव ठेवलंय सुंदर नाव”, “छान नाव बाळाला खूप प्रेम आणि आशीर्वाद” अशा प्रतिक्रिया या पोस्टवर आल्या आहेत.
विकी-कतरिनाने ७ नोव्हेंबर २०२५ रोजी लग्नानंतर चार वर्षांनी आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं. अभिनेत्री ४२ व्या वर्षी आई झाली आहे. मुलगा झाल्याची आनंदाची बातमी शेअर करत अभिनेत्याने या पोस्टला ‘Blessed’ असं कॅप्शन दिलं होतं. “आम्ही खूप प्रेमाने आणि कृतज्ञतेने आमच्या मुलाचं स्वागत करतोय,” असं विकीने यामध्ये म्हटलं होतं.
दरम्यान, बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांनी ९ डिसेंबर २०२१ रोजी लग्नगाठ बांधली होती. नुकतीच त्यांच्या लग्नाला ४ वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोघांचा शाही विवाहसोहळा राजस्थानमध्ये पार पडला होता.
