Katrina Kaif Birthday: बॉलीवूडमध्ये सौंदर्य, अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर स्वतंत्र ओळख निर्माण करणारी अभिनेत्री कतरिना कैफ आज तिचा ४३ वा वाढदिवस साजरा करत आहे. दोन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या कतरिनाने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. नुकतीच आई झालेली कतरिना ही एक यशस्वी बिझनेस वूमनदेखील आहे. तिचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. मात्र, लाखो चाहत्यांची लाडकी असलेल्या कतरिना कैफचं खरं नाव काही वेगळंच आहे. कतरिनाच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आयुष्यातील काही माहीत नसलेल्या गोष्टी जाणून घेऊया.

कतरिना कैफने २००३ मध्ये ‘बूम’ या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. तिचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरल्यानंतरही तिने आपले प्रयत्न थांबवले नाहीत. अभिनय आणि भाषेवर काम करत तिने दाक्षिणात्य सिनेविश्वातही काम केले. कतरिनाने तेलुगू चित्रपट ‘मल्लीस्वरी’मध्येही काम केले होते. मात्र, खरी प्रसिद्धी तिला सलमान खानसह मिळाली. २००५ मध्ये तिने सलमानसह ‘मैंने प्यार क्यों किया?’ या सिनेमामध्ये स्क्रीन शेअर केली आणि तिची भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली. तिचे सौंदर्य आणि तिची पडद्यावरील उपस्थिती यामुळे तिने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आणि त्यानंतर तिने अनेक सुपरहिट चित्रपट देत सिनेविश्व अक्षरशः गाजवले, त्यामुळे तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला. काही वर्षांमध्ये कतरिना कैफ ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक बनली. पण, अनेकांना आजपर्यंत तिचे खरे नाव माहीत नाही.

काय आहे कतरिनाचं खरं नाव?

अनेकांना हे माहीत नाही की, कतरिना कैफचं पूर्ण नाव वेगळेच आहे. तिचं खरं नाव कतरिना टरकॉट आहे. तिच्या आईचं आडनाव टरकॉट असल्याने सुरुवातीला ती याच नावाने ओळखली जात होती. मात्र, बॉलीवूडमध्ये पदार्पण करताना भारतीय प्रेक्षकांना सहज उच्चारता येईल आणि लक्षात राहील, अशा नावाची गरज असल्याने तिला नावामध्ये बदल करण्याचे सुचवण्यात आले. जनसत्ताच्या रिपोर्टनुसार, ‘बूम’ चित्रपटाच्या निर्मात्यांनीही तिला नाव बदलण्याचा सल्ला दिल्याचं म्हटलं जातं. त्यानंतर तिने ‘कतरिना कैफ’ हे नाव स्वीकारलं. याच नावाने तिने बॉलीवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आणि आज जगभरातील चाहत्यांमध्ये ती ‘कतरिना कैफ’ या नावानेच लोकप्रिय आहे.

कतरिना कैफचे बालपण हे वेगवेगळ्या देशांमध्ये गेले आहे. तिची आई सामाजिक कार्य करीत असल्यामुळे कतरिनाचे बालपण आणि शिक्षण विविध देशांमध्ये झाले. कतरिनाला सहा बहिणी आणि एक भाऊ आहे. वयाच्या चौदाव्या वर्षी कतरिनाने ‘ब्यूटी कॉन्टेस्ट’ स्पर्धा जिंकली होती. यानंतर मॉडेलिंग स्पर्धेमध्ये सहभागी होत तिने मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली. मॉडेलिंगमध्ये नशीब आजमावल्यानंतर तिने बॉलीवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली. मात्र, बॉलीवूडमधील कतरिनाचा प्रवास सहजसोपा नव्हता. भाषेमध्ये आणि तिच्या अभिनयामुळे अनेकांनी तिच्यावर नाराजी व्यक्त केली होती. मात्र, स्वतः मेहनत घेत आणि कामाबाबत प्रामाणिक राहत कतरिनाने एक यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण केली. या प्रवासात तिला सलमान खानने एक मार्गदर्शक म्हणून खूप साथ दिली.

कतरिना व विकी कौशल

कतरिना कैफने ‘नमस्ते लंडन’, ‘वेलकम’, ‘सिंह इज किंग’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘अजब प्रेम की गजब कहानी’, ‘रेस’. ‘एक था टायगर’, ‘धूम ३’, ‘टायगर जिंदा है’ आणि ‘मेरी ख्रिसमस’ अशा अनेक सिनेमांमध्ये भूमिका साकारत जवळपास बॉलीवूडच्या सर्वच स्टार हीरोबरोबर स्क्रीन शेअर केली. कोणत्याही वादामध्ये न अडकणाऱ्या कतरिना कैफने ९ डिसेंबर २०२१ रोजी अभिनेता विकी कौशलबरोबर विवाह केला. विकी व कतरिना यांचं लग्न चर्चेमध्ये आलं होतं. लग्नानंतर चार वर्षांनी, ७ नोव्हेंबर २०२५ रोजी कतरिनाने गोंडस मुलाला जन्म दिला असून त्याचे नाव ‘विहान’ ठेवलं आहे.