बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरचं नाव आजवर अनेक अभिनेत्रींबरोबर जोडलं गेलं आहे. त्याचे रिलेशनशिप, ब्रेकअप अनेकांच्या चर्चेचा विषय राहिला आहे. दीपिका पादुकोणपासून ते कतरिना कैफपर्यंत त्याने अनेक लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेत्रींना डेट केलं आहे. यामुळे त्याच्याबद्दल प्ले बॉय अशी प्रतिमाही तयारी झाली होती. अशातच कतरिना व त्याच्या नात्याबद्दलची एक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री त्याच्या प्रेमापोटी ब्रेकअपनंतरही पुन्हा त्याने बोलावल्यास त्याच्याकडे जाण्यास तयारी होती.

बॉलीवूडमधील अनेक लोक रणबीर-कतरिनाच्या रिलेशनशिपबद्दल बोलताना दिसतात. अशातच आता पत्रकार विकी लालवाणीने रणबीरबरोबरच्या ब्रेकअपनंतर कतरिनाची काय अवस्था होती आणि तिने त्याला नेमकं काय सांगितलं होतं याबद्दल खुलासा केला आहे. सिद्धार्थ कन्ननशी बोलताना विकी लालवानीने कतरिना कैफने ‘धूम ३’ साइन करण्याच्या आसपासच्या काळातील मुलाखतीबद्दल सांगितलं. त्याच्या म्हणण्यानुसार, त्या मुलाखतीदरम्यान कतरिनाने रणबीर कपूरबरोबर झालेल्या तिच्या आधीच्या ब्रेकअपबद्दलही भाष्य केलं होतं.

रणबीरच्या प्रेमात बुडालेली कतरिना कैफ

विकी लालवानीच्या म्हणण्यानुसार, “तो मला पुन्हा स्वीकारायला तयार असेल, तर मी रणबीरकडे परत जाईन,” असं कतरिनाने त्याला सांगितलं होतं. विकी लालवानीने सांगितलं की, हे वक्तव्य तो प्रकाशित करू शकतो का, असं त्यांने कतरिनाला स्पष्टपणे विचारलं होतं आणि तिने त्याला त्यासाठी परवानगी दिली होती. त्यावेळी कतरिना रणबीरच्या प्रेमात खूपच बुडालेली होती, असं त्याला वैयक्तिकरित्या जाणवल्याचंही त्याने सांगितलं.

फोटो – इंडियन एक्स्प्रेस

झहरा जानीच्या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या आणखी एका मुलाखतीत पत्रकार पूजा सामंतने रणबीरबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर व्हाय.आर.एफ स्टुडिओमध्ये कतरिनाची भेट घेतल्याचा अनुभव सांगितला.पूजा सामंत म्हणाली, “आम्ही कतरिनाची मुलाखत घेण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी ती खूप रडत होती. ती म्हणत होती, माझ्याकडून चूक झाली आहे आणि माझं काम कमी झालं, त्यासाठी मीच जबाबदार आहे.” तिने पुढे सांगितलं की, कतरिनाने तिला सांगिलेलं की “मी त्याच्या प्रेमात पडले आणि त्यानंतर गोष्टी बिघडत गेल्या. आता आम्ही एकत्र नाही. पण त्याच्यामुळे माझं करिअर मीच खराब केलं.” पूजा सामंतच्या म्हणण्यानुसार, कतरिनाला असं वाटत होतं की, रणबीरबरोबर नात्यात असताना तिने अनेक संधी नाकारल्या होत्या.

कतरिनाने त्यावेळी करिअरबाबत असे निर्णय का घेतले असावेत, याबद्दल पूजा सामंतने स्वतःचं मतही मांडलं. ती पुढे म्हणाली, “कदाचित तिला वाटलं असेल की रणबीरशी लग्न केल्यानंतर ती कपूर कुटुंबाची सदस्य बनेल आणि कदाचित त्या कुटुंबात सुना चित्रपटांमध्ये काम करत नाहीत, असं तिला वाटलं असेल. निदान त्यावेळी तरी तसं होतं, आता परिस्थिती बदलली आहे. तिने अनेक चित्रपटांच्या ऑफर्स सोडल्या होत्या. त्यामुळे ती खूप निराश झाली होती.”

मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार रणबीर कपूर आणि कतरिना कैफ अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. २०१६ मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर २०१७ मध्ये दोघे ‘जग्गा जासूस’ या चित्रपटात पुन्हा एकत्र दिसले. कतरिनाने डिसेंबर २०२१ मध्ये विकी कौशलबरोबर लग्न केलं, तर रणबीरने एप्रिल २०२२ मध्ये आलिया भट्टबरोबर लग्न केलं. आता रणबीर, आलिया आणि विकी हे तिघेही संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत.