रणबीर कपूरने २००७ मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. देखणा रणबीर कपूर लवकरच तरुणींमध्ये खूप लोकप्रिय झाला. तो त्याच्या चित्रपटांबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिला. रणबीरचं दोन आघाडीच्या अभिनेत्रींबरोबर अफेअर राहिलं. एक दीपिका पादुकोण आणि दुसरी कतरिना कैफ. दोघींबरोबर ब्रेकअप झाल्यावर आलिया भट्ट त्याच्या आयुष्यात आली आणि त्याने आलियाशी लग्न केलं.

रणबीर व आलियाच्या लग्नाला लवकरच ४ वर्षे होतील. पण त्याच्या अफेअरबद्दल अनेक किस्से अजूनही व्हायरल होत असतात. एका मुलाखतीत पत्रकार पूजा सामंतने रणबीर व कतरिनाच्या नात्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या. रणबीरबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर कतरिनाला भेटायला गेले, तेव्हा ती रडत होती, असं पूजा म्हणाली. ब्रेकअपनंतर कतरिना खूप भावनिक झाली होती. रणबीरबरोबर लग्न करायचं स्वप्न पाहत असल्याने कतरिनाने अनेक चित्रपटांच्या ऑफर नाकारल्या होत्या, असंही पूजाने नमूद केलं.

Katrina Kaif Ranbir Kapoor Breakup: पूजा म्हणाली, “जेव्हा आम्ही कतरिनाची मुलाखत घेण्यासाठी YRF स्टुडिओमध्ये गेलो होतो, तेव्हा कतरिना हमसून हमसून रडत होती. ‘मी चुकले, हातातून सिनेमे गेले, याला मीच जबाबदार आहे’ असं कतरिना म्हणत होती. कतरिना रडत रडत आम्हाला सांगत होती की तिचं रणबीरवर प्रेम आहे, पण गोष्टी जुळून आल्या नाहीत आणि आता ते एकत्र नाहीत. त्याच्यामुळे मी माझं करिअर बरबाद केलं,” असं विधान कतरिनाने केल्याचं पूजाने सांगितलं.

लग्नानंतर कपूर कुटुंबाचा भाग होणार, कपूर कुटुंबात लग्नानंतर सुना चित्रपटांमध्ये काम करत नाही, त्यामुळे कतरिनाने चित्रपट नाकारले होते. ती खूप निराश झाली होती, असं पूजा सामंतने सांगितलं.

दीपिका पादुकोण-रणबीरच्या नात्याबद्दल पूजा सामंत काय म्हणाली?

Deepika Padukone Ranbir Kapoor Breakup: पूजा सामंतने दीपिका आणि रणबीरच्या नात्याबद्दल सांगितलं. दोघांचं प्रेम त्यांच्या मेकअप आर्टिस्टमुळे फुललं होतं. मेकअप आर्टिस्टने त्यांना एकमेकांचे नंबर एक्सचेंज करून दिले होते. त्यावेळी रणबीर संजय लीला भंसाळींच्या ‘सांवरिया’मध्ये काम करत होता. तर दीपिका ‘ओम शांति ओम’मध्ये काम करत होती.

“दीपिकाच्या मेकअप आर्टिस्टने तिला सांगितलं की रणबीर तिच्या शेजारी शूटिंग करत आहे. दीपिका म्हणाली, ‘मी त्याचं नाव ऐकलं आहे.'” दुसरीकडे, रणबीरच्या मेकअप आर्टिस्टने त्याला सांगितलं की प्रकाश पदुकोणची मुलगी त्याच्या शेजारी शूटिंग करत आहे. हे ऐकून रणबीरने दीपिकाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली.

“रणबीर म्हणाला, ‘मला तिला भेटायचं आहे, मला तिचा नंबर हवा आहे.’ मग मेकअप आर्टिस्टने त्यांचे नंबर एक्सचेंज केले आणि त्यांनी एकमेकांशी संपर्क साधला,” असं पूजा म्हणाली. रणबीर आणि दीपिका पहिल्यांदा मुंबईतील ग्रँड हयात कॉफी शॉपमध्ये भेटले होते. दीपिका आणि रणबीर नंतर डेट करू लागले, पण काही काळाने त्यांचं ब्रेकअप झालं. दीपिकाने ‘कॉफी विथ करण’ मध्ये रणबीरने तिला फसवल्याचे संकेत दिले होते.

दरम्यान, रणबीर व त्याच्या दोन्ही एक्स गर्लफ्रेंड आयुष्यात पुढे गेले आहेत. रणबीरने आलिया भट्टशी लग्न केलं. त्यांना राहा नावाची मुलगी आहे. दीपिका पादुकोणने रणवीर सिंहशी लग्न केलं, त्यांना दुआ ही मुलगी आहे. तर कतरिना कैफने विकी कौशलशी लग्न केलं. त्यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये पहिल्या मुलाचं स्वागत केलं.