Katrina Kaif Makeup Artist Daniel Bauer : बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री कतरिना कैफचा प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट डॅनियल बाउर याने मेकअप ब्रशेसच्या स्वच्छतेबाबत महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. योग्य मेकअप प्रॉडक्ट्स वापरण्याइतकंच ब्रश स्वच्छ ठेवणं गरजेचं असल्याचं त्याने स्पष्ट केलं. कोणत्याही महागड्या गॅझेट्सचा वापर न करता लहान मुलांसारखी काळजी घेत कोमट पाणी आणि बेबी शॅम्पूच्या साहाय्याने तो २० वर्षे जुने ब्रशेस आजही वापरत आहे. अस्वच्छ ब्रशेसमुळे त्वचेवर बॅक्टेरिया साचून मुरुम आणि इन्फेक्शन होऊ शकते. तसेच ऑलिव्ह ऑइलने ब्रश साफ करणे कसे हानिकारक ठरू शकते, याबद्दलही त्याने सांगितलं.

मेकअप ब्रश आपल्या रोजच्या मेकअप रुटीनमधील अत्यंत महत्त्वाचा भाग असतात, पण जर ते नियमित स्वच्छ केले नाहीत, तर त्यामध्ये धूळ, तेल, बॅक्टेरिया आणि जुन्या मेकअपचे कण साचू शकतात. अनेक लोक महागडे ब्रश खरेदी करतात, पण त्यांची नीट स्वच्छता राखत नाहीत. याचा थेट परिणाम मेकअप आणि त्वचेच्या आरोग्यावर होतो. अभिनेत्री कॅटरिना कैफचा मेकअप आर्टिस्ट डॅनियल बाउरच्या मते, योग्य मेकअप प्रॉडक्ट्स निवडणं जेवढं महत्त्वाचं आहे, तितकंच ब्रश स्वच्छ ठेवणंही गरजेचं आहे.

मेकअप ब्रश हे तुमची कला दर्शवतात आणि उत्तम दर्जाचे ब्रश आयुष्यभर टिकू शकतात, असं डॅनियर बाउर म्हणाला. ‘हिंदुस्तान टाईम्स’च्या वृत्तानुसार, डॅनियल आजही तब्बल २० वर्षांपूर्वीचे ब्रश वापरतो, कारण त्यांची ब्रश स्वच्छ करण्याची पद्धत कधीच बदललेली नाही.

डॅनियल ब्रश कशाने साफ करतो?

“मला माझ्या मेंटॉरने मेकअप ब्रशेसची काळजी लहान मुलांसारखी घ्यायची, असं शिकवलं. मी कोणत्याही महागड्या गॅझेट्स किंवा ट्रेंड्सच्या पाठी न लागता अगदी साध्या पद्धतीचा वापर करतो. नॅचरल केस असलेल्या ब्रशेससाठी मी कोमट पाणी आणि ‘बेबी शॅम्पू’ वापरतो. तर तेलकट किंवा क्रीम प्रॉडक्ट्स वापरलेल्या सिंथेटिक ब्रशेससाठी अँटी-बॅक्टेरियल साबण उत्तम असते. त्यामुळे त्यावर साचलेला मेकअप सहज निघून जातो. धुतलेले हे ब्रशेस हवेशीर जागेत वाळवत ठेवल्यास ते खूप काळ टिकतात,” असं डॅनियल बाउर म्हणाला.

मेकअप ब्रश स्वच्छ करणं का गरजेचं?

जर तुम्ही स्किनकेअरला वेळ देत असाल, चांगल्या मेकअप प्रॉडक्ट्सवर पैसे खर्च करत असाल, पण ब्रशेस स्वच्छ करत नसाल, तर तुमचे सर्व प्रयत्न वाया जातात. कारण दरवेळी जेव्हा ब्रश त्वचेला स्पर्श करतो, तेव्हा त्यावर मेकअपचे कण, तेल, मृत त्वचा, घाम आणि प्रदूषण पुन्हा त्वचेवर साचतं. जर तुम्ही ब्रश नियमितपणे धुतले नाहीत, तर त्यावर बॅक्टेरिया, बुरशी आणि यीस्ट तयार होऊ शकतात.

स्वच्छ मेकअप ब्रशमुळे फक्त मेकअप चांगला बसतो असं नाही, तर त्यामुळे तुमची त्वचाही चांगली राहते. दर आठवड्याला फक्त काही मिनिटं ब्रश स्वच्छ केले, तर तुमचे ब्रशेस जास्त काळ टिकतील आणि त्वचाही निरोगी राहील.

ऑलिव्ह ऑइल ब्रश स्वच्छ करण्यासाठी वापरू नका

ऑलिव्ह ऑइलने मस्कारा पटकन निघतो, पण त्याचा वापर ब्रश साफ करण्यासाठी वापरू नका, असा सल्ला डॅनियलने दिला. ऑलिव्ह ऑइलमुळे ब्रशच्या केसांवर तेलकट थर तयार होतो आणि तो सहज निघत नाही. या थरात धूळ आणि मेकअपचे कण त्यात अडकतात, त्यामुळे ब्रश लवकर खराब होतात. तसेच ऑलिव्ह ऑइल क्लिनझिंगसाठी उपयुक्त नाही. ते बॅक्टेरिया, मृत त्वचा आणि घाम काढून टाकू शकत नाही. अस्वच्छ ब्रशेसमुळे चेहऱ्यावर मुरुम, जळजळ किंवा त्वचेचे इन्फेक्शन होऊ शकते.