बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ ही तिच्या वाढलेल्या वजनामुळे सोशल मीडियावर ट्रोल झाली. गरोदरपणानंतर तिचे वजन वाढल्याने ट्रोलर्सने तिला ट्रोल केले. यामुळे सलमान खानने ट्रोलर्सला फटकारले असून यानंतर कतरिनाने पहिल्यांदाच तिची भूमिका मांडली आहे. तिच्या ‘के ब्युटी’ (Kay Beauty) ब्रँडच्या कार्यक्रमामध्ये तिने सोशल मीडियावरील ट्रोलिंगबद्दल सांगितले. ऑनलाइन मतांचा आपल्या आत्मविश्वासावर किंवा आयुष्यातील निर्णयांवर परिणाम होऊ देऊ नये, अशी भूमिका कतरिना कैफने मांडली.

लंडनमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमामध्ये कतरिनाने सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना वैयक्तिक आयुष्यामध्ये किती महत्त्व द्यायचे याबद्दल मत मांडले. ती म्हणाली, “मला वाटतं, सोशल मीडियावरील चर्चांचा किंवा मतांचा आपल्या स्वतःच्या आत्मसन्मानावर आणि स्वतःकडे बघण्याच्या दृष्टिकोनावर फरक न पडू देण्याबाबत काळजी घेतली पाहिजे. कारण तिथे इतक्या वेगवेगळ्या प्रकारची मतं असतात की, जर त्याचा विचार करून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करायला लागलो, तर स्वतःसाठी निर्णय घेण्याच्या क्षमतेवर नक्कीच परिणाम होईल.”

कदाचित भीतीपोटी पॅरालाइज्ड होऊन मी काहीच करू शकले नसते – कतरिना

पुढे कतरिना म्हणाली, “वैयक्तिक माझ्याबाबतीत सांगायचं झालं तर प्रत्येक वेळी लोकांनी केलेली टीका आणि त्यांनी बोलल्याप्रमाणे मी वागले असते तर कदाचित भीतीपोटी पॅरालाइज्ड होऊन मी काहीच करू शकले नसते. तसेच आयुष्यात पुढं जाणंसुद्धा माझ्यासाठी अवघड झालं असतं. असे काही क्षण येतात, जेव्हा हे जग तुमचं खूप कौतुक करतं, तर काही वेळा तुम्हाला स्वतःलाच प्रोत्साहन देऊन पुढं जावं लागतं.”

कतरिना कैफ

पुढे कतरिना म्हणाली, “आयुष्यात अशीही वेळ येते की तुम्हाला वाटतं सगळं अगदी छान सुरू आहे. पण असासुद्धा काळ येतो, जिथे तुम्हाला स्वतःला काहीच नीट जमत नाहीये असं वाटतं. कधीकधी तुम्हाला स्वतःचे रूप आणि व्यक्तिमत्त्व खूप चांगलं आहे असं वाटतं असतं; तर कधी तुम्ही ते मिळवण्याच्या प्रवासात आहात असं वाटतं. मला वाटतं की, या सर्व गोष्टींकडे खूप सहज दृष्टीने पाहिलं पाहिजे आणि स्वतःला फार गांभीर्याने न घेता त्या प्रक्रियेचा आनंद घेत जगलं पाहिजे, हेच खूप चांगलं आहे.”