Katrina Kaif Birthday Photos: बॉलीवूडची लाडकी अभिनेत्री कतरिना कैफ हिने नुकताच आपला ४३ वा वाढदिवस साजरा केला. कतरिनाचा यंदाचा वाढदिवस तिच्यासाठी अतिशय खास आणि भावनिक ठरला, कारण आई झाल्यानंतरचा तिचा हा पहिलाच वाढदिवस होता. या णि साध्या सेलिब्रेशनचे इनसाइड फोटो कतरिनाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये चिमुकल्या विहानची पहिली झलक पाहायला मिळत आहे. एका फोटोत विहानने आपल्या चिमुकल्या हातांनी कतरिनाचे नाक पकडल्याचे दिसत असून दुसऱ्या फोटोत विकी कौशल कतरिनाकडे कौतुकाने पाहत आहे.
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या मुलाचे नाव विहान कौशल आहे. त्याचा जन्म ७ नोव्हेंबर २०२५ रोजी झाला. मुलाच्या जन्मानंतरचा हा कतरिनाचा पहिलाच वाढदिवस होता. तिने पती विकी व मुलगा विहानबरोबर साधेपणाने वाढदिवस साजरा केला. या खास सेलिब्रेशनचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये कतरिना खूपच सुंदर दिसतेय.
पहिल्या फोटोत कतरिनाने विहानला वर उचललं असून त्याच्या हातांना ती किस करतेय. दुसऱ्या फोटोत ती एकटीच हसताना दिसतेय. तिसऱ्या फोटोत तिच्याकडे विकी पाहतोय. चौथ्या फोटोत कतरिना पाठमोरी दिसतेय. तर पाचव्या फोटोत विहानने त्याच्या चिमुकल्या हातांनी कतरिनाचं नाक पकडलं आहे. “तू माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान आशीर्वाद आहेस, त्यासाठी मी नेहमीच कृतज्ञ राहीन. आयुष्यातील बेस्ट वाढदिवस”, असं कॅप्शन कतरिनाने या फोटोंना दिलं आहे.
पाहा कतरिना कैफची पोस्ट
कतरिना कैफने शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. दिया मिर्झा, वाणी कपूर, निल नितीन मुकेश, अदिती राव हैदरी, झोया अख्तर, सोफी चौधरी यांनी कतरिनाच्या पोस्टवर कमेंट्स करून प्रेमाचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, विकी कौशलने कतरिनाच्या वाढदिवशी एक खास फोटो पोस्ट करून तिला शुभेच्छा दिल्या. ‘जान का जन्मदिन’ असं कॅप्शन त्याने या फोटोंना दिलं होतं. आता कतरिनाने सेलिब्रेशनची व विहानची झलक चाहत्यांना दाखवली.
दरम्यान, विकी कौशल आणि कतरिना कैफ ९ डिसेंबर २०२१ रोजी विवाहबंधनात अडकले. राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे एका भव्य किल्ल्यात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. या लग्नाला त्यांचे जवळचे कुटुंबीय आणि मोजकेच मित्र उपस्थित होते. लग्नानंतर ४ वर्षांनी त्यांनी त्यांचा पहिला मुलगा विहान कौशलचं स्वागत केलं. कतरिना कैफ सध्या मोठ्या पडद्यापासून दूर आहे. ती मुलगा विहानबरोबर वेळ घालवतेय.
