Happy Birthday Vicky Kaushal : बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता विकी कौशलने १६ मे रोजी त्याचा ३८वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने त्याच्यावर संपूर्ण कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. याशिवाय अभिनेत्री व विकीची पत्नी कतरिना कैफने सुद्धा लाडक्या नवऱ्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

कतरिना कैफने विकी कौशलबरोबरचे गोड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामधील दुसऱ्या फोटोमध्ये विकी-कतरिनाच्या लेकाची झलक चाहत्यांना पाहायला मिळत आहे. तर तिसऱ्या फोटोमध्ये ‘Happy Birthday Papa’ असं नाव लिहिलेला सुंदर केक पाहायला मिळतोय.

कतरिना लिहिते, “वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा…! दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा तिच जागा, सगळ्या गोष्टी किती बदलल्या आहेत. या काळात मी तीन गोष्टींवर विश्वास ठेवला त्या म्हणजे प्रार्थना, संयम आणि श्रद्धा…आणि आज आपण आपल्या चिमुकल्याबरोबर तुझा वाढदिवस तेवढ्याच आनंदाने साजरा करत आहोत. माझं मन भरून आलंय आणि मी कृतज्ञ आहे. या गेल्या काही वर्षांत तू माझा आधारस्तंभ झाला आहेस. तुझ्यात ९९ टक्के पेशन्स आहेत… ( कदाचित ९८ टक्के ) पण, तुझ्यापेक्षा जास्त पेशन्स कोणातही नसतील. माझ्या सगळ्या न संपणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तू कायम तेवढ्याच संयमाने देतोस. यासाठीही माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.”

“तू आता पौराणिक कथा, एआय, मेकअप, आरोग्य, व्यवसाय साधारपणे प्रत्येक गोष्टीतला तज्ज्ञ झाला आहेस. तुझ्या वाढदिवशी…तू सकाळी उठल्यापासून ते माझे प्रश्न सुरू होईपर्यंत तुला ब्लॅक कॉफी पिण्यासाठी थोडा जास्त वेळ मिळूदेत.” अशी पोस्ट लिहित कतरिनाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

कतरिना कैफने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांसह बॉलीवूड कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान, कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी ९ डिसेंबर २०२१ रोजी लग्नगाठ बांधली होती. या दोघांचा शाही विवाहसोहळा राजस्थानमध्ये पार पडला होता. लग्नानंतर चार वर्षांनी ७ नोव्हेंबर २०२५ रोजी या जोडप्याने त्यांच्या बाळाचं स्वागत केलं. कतरिना-विकीने त्याच्या चिमुकल्याचं नाव विहान असं ठेवलं आहे.