Salman Khan 60th Birthday : बॉलीवूडचा भाईजान सलमान खान आज त्याचा ६० वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने संपूर्ण मनोरंजन विश्वातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची सलमानची जवळची मैत्रीण व अभिनेत्री कतरिना कैफने आज त्याच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.
सलमान खान व कतरिना कैफ यांच्या जोडीने एकत्र अनेक चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. ‘मैंने प्यार क्यू किया’, ‘एक था टायगर’, ‘टायगर जिंदा है’ यासह २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भारत’ चित्रपटात देखील चाहत्यांना कतरिना-सलमानची ऑनस्क्रीन जोडी पाहायला मिळाली होती. आता भाईजानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना कतरिना कैफने तिच्या पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलंय पाहुयात…
सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत कतरिना लिहिते, “टायगर, टायगर, टायगर…! तू माणूस म्हणून खूपच चांगला ( Super Human ) आहेस. तुला ६० व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस आनंदात जाऊदेत.”
दरम्यान, कतरिना व सलमान यांनी शेवटचं ‘टायगर ३’ चित्रपटात काम केलं होतं. यामध्ये इमरान हाश्मी सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकला होता. तर, शाहरुख खानने या सिनेमात कॅमिओ केला होता.

सलमान खानच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन
सलमान खानच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या पनवेलच्या फार्महाऊसवर शुक्रवारी रात्री जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी या पार्टीला उपस्थिती लावली होती. हुमा कुरेशी, संगीता बिजलानी, मिका सिंग, संजय दत्त हे सगळे या पार्टीला उपस्थित होते. याशिवाय भारताचा माजी कर्णधार धोनी सुद्धा सलमानच्या बर्थडे पार्टीला पत्नीसह पोहोचला होता. याचे व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. याशिवाय सलमानने आपल्या चाहत्यांसह व पापाराझींबरोबर एक केक सुद्धा कापला.
