कतरिना कैफ आणि तिची बहीण इसाबेल या दोघींचं संगोपन त्यांच्या आईनेच केलं. कतरिनाने एकदा चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिच्या आयुष्यावर आईचा किती मोठा प्रभाव आहे, याबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं होतं. कतरिनाने आतापर्यंत अनेक लोकप्रिय अभिनेत्यांसह काम केलं आहे आणि अनेक हिट चित्रपट दिले आहेत. परंतु, अभिनेत्रीने या सगळ्या यशाचं श्रेय तिच्या आईला आणि त्या करत असलेल्या सामाजिक कार्याला दिलं आहे.
कतरिनाने तिचा मुलगा विहानच्या जन्मानंतर ब्रेक घेतला असून ती सध्या मुलाच्या संगोपनात व्यग्र आहे. परंतु, यापूर्वी तिने अनेक चित्रपटात काम करत मेहनत आणि कलेच्या जोरावर इडंस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. सध्या अभिनेत्री तिच्या मेकअप ब्रॅडच्या व्यवसायातही व्यग्र आहे. अशातच सोशल मीडियावर तिचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती तिच्या आईबद्दल बोलताना दिसत आहे.
कतरिना कैफ आईबद्दल काय म्हणाली?
२०१४ मध्ये ‘फितूर’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिने तिच्या आईच्या सामाजिक कार्याबद्दल सांगत असताना त्यांच्या कामामुळेच तिला तिच्या आयुष्यात इतकं यश, लोकप्रियता मिळवता आली असं म्हटल्याचं समोर आलेल्या व्हिडीओमधून दिसत आहे. या व्हिडीओत ती तिच्या आईबद्दल बोलताना म्हणाली, “माझी आई इथेच राहते. इथे म्हणजे दिल्लीत नाही मधुराईमध्ये. तिथे तिने एक खूप चांगली शाळा सुरू केली आहे.सगळ्या मुलांसाठी. माझी आई शिक्षिका आहे. ती रोज शाळेत जाते आणि मुलांना शिकवते आणि खूप आनंदी आहे.”
कतरिना आईबद्दल पुढे म्हणाली, “माझ्या आईच्या सामाजिक कार्यामुळेच मला इतकं यश, काम सगळ्या गोष्टी मिळाल्या. तिथे राहणं सोप नाहीये. खूप अवघड आहे. अनेकदा तिथे फक्त १२ तासांसाठीच वीजपुरवठा असतो. त्यामुळे कधी कधी मी आईला व्हिडीओ कॉल करते तेव्हा ती वीज नाहीये असं सांगते मग आम्ही फक्त फोनवरच बोलतो.”
माध्यमांच्या माहितीनुसार कतरिना कैफची आई सुझान टरकॉट एक वकील आणि शिक्षिका आहेत. त्यांची तमिळ नाडू मधुराईमध्ये शाळा असून त्या मुलांना शिकवण्याचं काम करतात.
