Katrina Kaif on Post Pregnancy Body Trolling: कतरिना कैफ वर्षभरापूर्वी आई झाली. सध्या ती चित्रपटांपासून दूर मुलाबरोबर वेळ घालवत मातृत्वाचा अनुभव घेत आहे. प्रसूतीनंतर कतरिनाचं वाढलेलं वजन आणि ती कशी दिसतेय? याबद्दल सोशल मीडियावर खूपच चर्चा सुरू आहे. कतरिनाने स्वतः प्रसूतीनंतर झालेल्या बदलांबद्दल सांगितलंय. कतरिनाच्या मते, सुंदर दिसणं म्हणजे केवळ बाह्य रूप नसून आतून प्रसन्न, चांगलं वाटणं होय. चित्रपट, रेड कार्पेट आणि फोटोशूट्सपासून ते स्वतःचा मेक-अप ब्रँड सुरू करण्यापर्यंत सौंदर्य हा तिच्या आयुष्याचा कायम महत्त्वाचा भाग राहिला आहे. मात्र, आई झाल्यानंतर तिचा सौंदर्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून आता ती स्वतःच्या आरोग्याला अधिक प्राधान्य देते.

नुकतीच कतरिना विकीबरोबर अंबानींच्या गणपतीच्या दर्शनाला गेली होती. तेथील फोटो व व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. तिच्या बाळंतपणानंतरच्या शरीरावर आणि दिसण्यावर टीका करत तिच्या जुन्या मॉडेलिंगच्या दिवसांशी तुलना केली गेली. ‘द हॉलीवूड रिपोर्टर इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत तिने यावर भाष्य केलं.

चांगलं दिसणं म्हणजे चांगलं वाटणं- कतरिना कैफ

कतरिना म्हणाली, “माझ्या मॉडेलिंग आणि अभिनयाच्या सुरुवातीच्या काळात ब्युटी स्टँडर्ड्सबद्दल अनेक रूढ संकल्पना होत्या. पण आता माझ्यासाठी चांगलं दिसणं म्हणजे आतून चांगलं वाटणं आहे आणि हे स्वतःची योग्य काळजी घेतल्यानेच शक्य होतं.”

Katrina Kaif Post Pregnancy Transformation
कतरिना कैफचा गणपती दर्शनाचा लूक (फोटो- इन्स्टाग्राम)

कतरिना कैफची दिनचर्या

योग्य आहार, नियमित व्यायाम, ध्यानधारणा, सकाळी एक तास फोनपासून दूर राहणे आणि कोवळा सूर्यप्रकाश घेणे यामुळे खूप सकारात्मक बदल होतात, असं कतरिना मानते. आपण आतून निरोगी असलो की तो आत्मविश्वास चेहऱ्यावर आपोआप दिसतो, असं तिचं मत आहे.

यावर बंगळुरू येथील त्वचाशास्त्रज्ञ डॉ. शिरीन फुर्टाडो सांगतात की, बाळंतपणानंतर त्वचा, केस आणि शरीरात होणारे बदल पूर्णपणे सामान्य आहेत. नवीन मातांनी सोशल मीडिया किंवा सेलिब्रिटींशी स्वतःची तुलना न करता, स्वतःच्या कम्फर्टनुसार त्वचेची काळजी घ्यावी.

katrina kaif with baby
कतरिना कैफ मुलगा विहानबरोबर (फोटो- इन्स्टाग्राम)

गरोदरपणानंतर आपली त्वचा खूप संवेदनशील झाली आहे, असं कतरिनाने सांगितलं. अशा वेळी त्वचेला काय सुट होतं हे समजणं कठीण असतं. सध्या ती त्वचेला आतून हायड्रेट ठेवण्यावर भर देत आहे.

katrina kaif vicky kaushal
कतरिना कैफ व तिचा पती विकी कौशल (फोटो- इन्स्टाग्राम)

डॉ. फुर्टाडो यांच्या मते, बाळंतपणानंतर हॉर्मोन्समधील बदल, अपुरी झोप आणि तणाव यामुळे त्वचा कोरडी, संवेदनशील किंवा तेलकट होऊ शकते. त्यामुळे या काळात घाईघाईने जुन्या रूपात येण्याचा प्रयत्न न करता त्वचेची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांनी दिलेल्या काही टिप्स खालीलप्रमाणे…

नवीनच आई झालेल्या महिलांसाठी टिप्स

  • कमी उत्पादनं वापरा: त्वचा संवेदनशील असताना कडक स्क्रब,केमिकल्स किंवा सुगंधित उत्पादनं वापरणं टाळा.
  • डॉक्टरांचा सल्ला: स्तनपान सुरू असताना ‘रेटिनॉइड्स’सारखे घटक वापरण्यापूर्वी स्कीन एक्सपर्ट्सचा सल्ला घ्या.
  • सोपी दिनचर्या: सौम्य क्लिंजर, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीनचा वापर पुरेसा आहे.
  • योग्य लाइफस्टाइल: पुरेसं पाणी, संतुलित आहार, पुरेशी विश्रांती त्वचेचे आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत करते.