अभिनेत्री कतरिना कैफ बॉलीवूडमधील उत्कृष्ट नर्तिकांपैकी एक म्हणूनही ओळखली जाते. गेल्या अनेक वर्षांत तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकलीच, पण ‘शिला की जवानी’, ‘काला चश्मा’ आणि ‘चिकनी चमेली’ यांसारख्या गाण्यांमधील आपल्या जबरदस्त डान्स मूव्ह्जनेही चाहत्यांना भुरळ घातली आहे. मात्र, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कोरिओग्राफर बॉस्को यांनी कतरिनाबद्दलचा एक जुना किस्सा सांगितला. एकेकाळी दुसऱ्या एका कोरिओग्राफरने कतरिनाला झिरो डान्सर म्हटलं होतं, असा खुलासा त्यांनी केला.

बॉलीवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर जोडी बॉस्को आणि सीझर यांनी त्यांच्या पॉडकास्टमध्ये फराह खानला आमंत्रित केलं होतं. या संवादादरम्यान कतरिनाच्या डान्समध्ये गेल्या काही वर्षांत झालेल्या बदलाबद्दल चर्चा सुरू झाली. यावेळी बॉस्को यांनी कतरिनाच्या करिअरच्या सुरुवातीचा एक किस्सा सांगितला. कतरिनाने इंडस्ट्रीत पदार्पण केलं, तेव्हा एका कोरिओग्राफरने तिचा अक्षरशः छळ केला आणि तिला सतत अपमानित करायचे, असा दावा बॉस्को यांनी केला. मात्र, त्यांनी त्या कोरिओग्राफरचं नाव सांगितलं नाही.

फराह खानने केलं कतरिनाचं कौतुक

बॉस्को यांनी सांगितलं, “तिच्याबाबतीतही असे अनेक किस्से आहेत, जिथे तिने खूप मेहनत घेतली होती. पण एका कोरिओग्राफरने कतरिनाला, तुला डान्स अजिबात येत नाही, त्यामुळे तू हे सोडून दिलं पाहिजे, असं सांगितलं होतं.” फराह खान हे ऐकून आश्चर्यचकित झाली. ती म्हणाली, “अरे बिचारी! ती काही तशीच राहिली नसेल. तेव्हा ती डान्सच्या बाबतीत चार-पाच क्रमांकावर असेल. पण शिला की जवानीनंतर ती ९ किंवा १०वर पोहोचली. त्यानंतर चिकनी चमेली आणि काला चश्मा ही गाणी आली.” बॉस्को आणि सीझरनेही फराहच्या मताशी सहमती दर्शवत ‘शिला की जवानी’मधील कतरिनाच्या जबरदस्त डान्सचं कौतुक केलं. या कोरिओग्राफर जोडीने यापूर्वी कतरिनाबरोबर ‘रेस’ चित्रपटातील ‘टच मी’ या गाण्यासाठी काम केलं आहे.

कतरिनानेही यापूर्वी बॉलीवूड बबलला दिलेल्या एका मुलाखतीत करिअरमधील या कठीण काळाबद्दल भाष्य केलं होतं. अभिनेत्रीने सांगितलं होतं की, एकदा तिला “तुला डान्स करता येत नाही” असं सांगण्यात आलं होतं. या टीकेचा तिच्या आत्मविश्वासावर इतका परिणाम झाला की, आपण कधीच चांगली डान्सर बनू शकणार नाही, असं तिला वाटू लागलं होतं. कतरिनाच्या म्हणण्यानुसार, बॉस्को यांनी तिचा हा दृष्टिकोन बदलण्यास मदत केली. त्यांनी कतरिनाला तू चांगली डान्सर आहेस, फक्त स्वतःवर आणखी काम करण्याची गरज आहे, असं सांगून तिचा आत्मविश्वास वाढवला. बॉस्को यांच्या प्रोत्साहनामुळे कतरिनाला स्वतःवर विश्वास ठेवण्यास आणि आपल्या डान्समध्ये सुधारणा करण्यास मदत झाली.

पॉडकास्टदरम्यान फराह खानने कतरिनाबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला ‘शिला की जवानी’ हे तिने कोरिओग्राफ केलेलं सर्वात कमी खर्चाचं गाणं होतं, असं सांगितलं. या गाण्यात फक्त कतरिना आणि १० पुरुष डान्सर्स होते. यावर बॉस्को यांनीही सहमती दर्शवत, ‘शिला की जवानी’ हे कतरिनाच्या करिअरसाठी गेमचेंजर ठरलेलं गाणं होतं, असं म्हटलं.