KBC Season 18 Aamir Khan Preity Zinta episode update : महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती १८’ (Kaun Banega Crorepati 18) या शोचा धमाकेदार शुभारंभ झाला आहे. या सीझनच्या पहिल्याच भागात बॉलिवूडचे दिग्गज कलाकार आमिर खान, सनी देओल आणि प्रीती झिंटा यांनी हॉटसीटवर हजेरी लावली. या एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांनी १५ वर्षांचा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी याच्यावर आधारित १ लाख रुपयांचा प्रश्न विचारला. क्रिकेटबद्दल माहिती नसल्याने आमिर खान आणि सनी देओल यांची चांगलीच तारांबळ उडाली, परंतु पंजाब किंग्सची सह-मालकीण असलेल्या प्रीती झिंटाने अंदाजे उत्तर दिलं.

‘इंडियन प्रीमियर लीग २०२६’ मध्ये ऑरेंज कॅप कोणी जिंकली? असा हा प्रश्न होता. यासाठी स्क्रीनवर पर्पल कॅपसमोर गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाचा फोटो दाखवण्यात आला होता आणि ऑरेंज कॅपसमोर कोणत्या खेळाडूचा फोटो येईल, असा प्रश्न विचारला गेला. अमिताभ बच्चन यांनी १ लाख रुपयांसाठी हा प्रश्न विचारला. यासाठी के. एल. राहुल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली आणि वैभव सूर्यवंशी हे ४ पर्याय देण्यात आले होते.

आमिर खान, प्रीती झिंटा व सनी देओलची चर्चा

स्क्रीनकडे पाहत आमिर खान प्रीती झिंटाला म्हणाला, “यार, क्रिकेटबद्दल तुला माहिती असायला हवं.” यावर सनी देओल म्हणाला, “मला क्रिकेटबद्दल काहीच माहीत नाही.” यानंतर अमिताभ बच्चन यांनी प्रश्न वाचून पर्याय दिले. मग ते प्रीती झिंटाला म्हणाले, “प्रीतीजी, तुम्ही तर टीमच्या मालकीण आहात.” यावर पंजाब किंग्सची सह-मालकीण म्हणाली, “सर, पण आम्ही जिंकलो नाही ना.” ती पुढे म्हणाली, “यशस्वी जयस्वाल तर नाहीये.” त्यावर आमिर खानने “के. एल. राहुल?” असं विचारलं. मग प्रीती झिंटा म्हणाली, “नाही, मला वाटतं वैभव सूर्यवंशी.”

वैभव सूर्यवंशीची आयपीएल २०२६ मधील कामगिरी

प्रीती झिंटाच्या म्हणण्यानुसार ‘वैभव सूर्यवंशी’ हे उत्तर लॉक करण्यात आलं. ते उत्तर अगदी बरोबर ठरलं आणि या तिघांनी एक लाख रुपये जिंकले. दरम्यान, आयपीएल २०२६ मध्ये १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने जबरदस्त कामगिरी केली होती. त्याने १६ सामन्यांमध्ये ४८.५० ची सरासरी आणि २३७.३० च्या स्ट्राइक रेटने ७७६ रन केले होते. यामध्ये त्याने १ शतक आणि ५ अर्धशतकं झळकावली होती. या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर वैभव सूर्यवंशीला भारतीय संघात स्थान मिळालं आणि तो भारताकडून खेळणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला.