Keerthy Suresh Diet Secrets : धावपळीच्या आणि धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येकजण स्वत:ला फिट ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. काहीजण स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम आणि डाएट फॉलो करतात. अनेकजण बॉलीवूडच्या कलाकारांकडूनही व्यायाम आणि डाएटच्या काही टिप्स फॉलो करतात.

सध्या अनेक अभिनेत्री आणि अभिनेते स्वत:च्या व्यायाम आणि डाएटबद्दल आपल्या चाहत्यांना सांगताना दिसतात. इंडस्ट्रीतले अनेक कलाकार हे रोजच्या आयुष्यात अगदी घरगुती जेवणातल्या पदार्थाचा वापर करतात. अशीच एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे किर्ती सुरेश.

एका जुन्या मुलाखतीत किर्तीने सांगितलं होतं की, लहानपणापासून ती सडपातळ होती आणि फारसा व्यायामही करत नव्हती. ती फक्त घरचे जेवण खात असे. ‘बिहाइंडवुड्स’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली होती, “मी आधीपासूनच बारीक होते आणि कधीच नियमित व्यायाम केला नव्हता. वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत मी व्यायाम तर सोडाच, खेळही खेळले नव्हते. शाळेत थोडं टेनिस खेळायचे. अभिनय सुरू झाल्यानंतर तर फक्त काम, झोप आणि खाणं… एवढंच आयुष्य होतं. सुरुवातीला मी खूप जास्त कार्डिओ केला आणि त्यामुळे माझं वजन तर कमी झालं, पण स्नायूही खूप कमी झाले. त्यामुळे मी खूपच बारीक दिसायला लागले.”

किर्ती सुरेश कधीही फॅन्सी डाएट न करता रोज घरचं, चवदार आणि पारंपरिक दक्षिण भारतीय जेवण खाणं पसंत करत असे. याबद्दल ती म्हणाली होती, “मी कधीच कोणताही खास डाएट केला नाही. ना केटो, ना दुसरं काही. माझा आहार फक्त हाय-प्रोटीन आणि लो-कार्ब आहे. मला जे खायचं असतं ते मी खाते. एखादी गोष्ट खायची इच्छा झाली, तर मी ते खाते. एखादं पदार्थ पाहून आणि त्याला घाबरून नकार देणं मला योग्य वाटत नाही. रोज ६ ते ७ अंडी (फक्त पांढरा भाग), पनीर, टोफू, सोया आणि डाळी खाते. विशेष म्हणजे मी प्रोटीन शेकही घेत नाही.”

किर्ती सुरेशच्या फिटनेस प्रवासातून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे, स्वतःच्या शरीराचं ऐकणं सर्वात महत्त्वाचं आहे. वय, आरोग्य आणि जीवनशैलीनुसार प्रत्येकाच्या फिटनेसचा मार्ग वेगळा असतो. त्यामुळे दुसऱ्यांची नक्कल न करता, आपल्यासाठी योग्य आणि टिकाऊ पद्धत निवडणं गरजेचं आहे. कारण – फिटनेस ही शर्यत नाही, तर आयुष्यभर चालणारा प्रवास आहे.

सूचना – कलाकारांचे डाएट आणि फिटनेस रूटीन हे त्यांच्या कामाचे स्वरूप आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठरवलेले असते. वरील माहिती अभिनेत्रीच्या वैयक्तिक अनुभवावर आधारित असून जुन्या मुलाखतीतील आहे. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक ठेवण, आरोग्य आणि गरजा वेगवेगळ्या असतात. त्यामुळे नवीन आहार किंवा व्यायामाचा प्रकार सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञ आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.