khaike paan banaras wala song : बिग बी अमिताभ बच्चन यांनी ७० ते ९० च्या दशकांमध्ये बॉलीवूड गाजवलं. त्यांचा रुबाबदार लूक, हटके अभिनय व खास डान्स यांमुळे अमिताभ यांचा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत होता. मात्र, १९७८ साली प्रदर्शित झालेल्या ‘डॉन’ या चित्रपटानं अमिताभ यांच्या करिअरला वेगळी कलाटणी दिली. विजयच्या दुहेरी भूमिकेसह चित्रपटातील गाणी सुपरहिट ठरली. याच चित्रपटातील ‘खाईके पान बनारसवाला’ हे गाणं तर आजही सर्वांच्या तोंडी ऐकायला मिळतं. मात्र, हे गाणं ‘डॉन’ नाही तर दुसऱ्याच चित्रपटासाठी तयार करण्यात आल्याचं समोर आलं आहे.

‘डॉन’ हा बॉलीवूडचा एव्हरग्रीन चित्रपट

दिग्गज अभिनेत्री झीनत अमान यांनी हे सुपरहिट गाणं डॉन चित्रपटामध्ये अगदी शेवटची क्षणी सामील करण्यात आल्याचं सांगितलं आहे.“डॉन को पकडना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है” अशा डायलॉगमुळे डॉन हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. त्यामध्ये विजय या पात्राची दुहेरी भूमिका, त्याचा मृत्यू आणि क्लायमॅक्समधील थरारक ट्विस्ट यांमुळे डॉन हा चित्रपट बॉलीवूडचा एव्हरग्रीन चित्रपट ठरला.

वेगळ्याच चित्रपटासाठी तयार करण्यात आले होते गाणे

त्यातील ‘खाईके पान बनारसवाला’ गाणं हे खरं तर १९७३ साली तयार करण्यात आलं होतं. हे गाणं डॉन नाही, तर देव आनंद यांच्या बनारसी बाबू या चित्रपटासाठी तयार करण्यात आलं होतं, अशी आश्चर्यकारक माहिती ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांनी सोशल मीडिया पोस्टवर दिली होती.

शेवटच्या क्षणी स्वीकारलं गाणं

डॉन नाही, तर बनारसी बाबू या चित्रपटासाठी ‘खाईके पान बनारसवाला’ गाणं तयार करण्यात आलं होतं. मात्र, गाण्याचे बोल हे हलके-फुलके आणि रंजक असल्यानं ते गाणं नाकारण्यात आलं. चित्रपटाच्या कथानकाबरोबर ते जुळत नसल्यानं पूर्ण गाणंच काढून टाकण्यात आलं. मात्र, नंतर ‘डॉन’ या चित्रपटामध्ये या गाण्यानं धुमाकूळ घातला. ‘डॉन’चे कथानक ट्विस्टपूर्ण होते आणि म्हणून दिग्दर्शक चंद्र बरोट यांनी ते ‘डॉन’मध्ये घेतले. ‘डॉन’ची शूटिंग पूर्ण झाली असताना अगदी शेवटच्या क्षणी दोन दिवस बाकी राहिलेले असताना ‘खाईके पान बनारसवाला’ हे गाणे चित्रपटात घेण्यात आले आणि त्या गाण्याला तुफान लोकप्रियता मिळाली.

किशोर कुमार यांनी गाण्यास दिला नकार अन्…

खाईके पान बनारसवाला या गाण्याचे शब्द अनजान यांनी लिहिले; तर कल्याणजी-आनंदजी यांनी संगीत दिले होते. मात्र, सुरुवातीला गायक किशोर कुमार यांनी गाणं गायला नकार दिला होता. गाण्याच्या शब्दांमुळे त्यांनी नकार दिला. मात्र, नंतर अनजान यांनी समजावल्यानंतर किशोर कुमार तयार झाले. गाणे ऐकताना ते खरे वाटावे म्हणून किशोर कुमार यांनी स्टुडिओमध्ये पान खाल्ले होते. त्याचबरोबर गाण्याच्या शूटिंगप्रसंगीही अमिताभ बच्चन यांनी जवळपास १५ पाने खाल्ली होती. त्यामुळे त्यांचे तोंड सोलले गेले होते.