Khushboo Patani Air Pistol Self Defense Advice For Girls: बिहार राज्यातील जमुई परिसरामध्ये एका अल्पवयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनीला कोचिंग क्लासवरून घरी जात असताना काही टोळक्यांनी अडवले आणि त्यांचा विनयभंग केला. बिहारमधील या घटनेवर बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटनीची बहीण व भारतीय लष्कराच्या माजी अधिकारी खुशबू पाटनी यांनी संताप व्यक्त केला. महिला सुरक्षेवरून कठोर भूमिका घेतल्यानंतर आता तिने मुलींना स्वरक्षणासाठी एअर पिस्तूल वापरण्याचा सल्ला दिला आहे.
खुशबू पाटनीने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करीत मुलींना स्वरक्षणासाठी एअर पिस्तूल वापरण्यास सांगितले आहे. तसेच हे पिस्तूल कसे वापरायचे याचे प्रशिक्षणही तिने सोशल मीडियावर दिले आहे. खुशबू म्हणाली, “मुलींनो, ही ग्लॉकची (मूळ शस्त्रासारखी बनवलेली) कॉपी आहे. हे CO2 आहे, यासाठी लायसन्स असण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला शूटिंग करण्याचा सराव करावा लागेल. तुमच्या घराच्या आजूबाजूला शूटिंग करण्याचा सराव करा. या पिस्तुलाचे वजनही जास्त नाही तर, फक्त दीड ते दोन किलो तिचे वजन आहे.”
लोकांवर अवलंबून राहण्याची काहीच गरज नाही – पाटनी
पुढे ती म्हणाली, “यामध्ये खऱ्या बंदुकीप्रमाणे गोळ्या भरल्या जात नाहीत. तसेच या बंदुकीमध्ये दारू किंवा पारंपरिक काडतुसेही न भरता, छर्रे (धातूच्या छोट्या छोट्या गोळ्या) भरले जातात. हे ‘छर्रे’ पुढे ढकलण्यासाठी त्या बंदुकीत कार्बन डाय-ऑक्साईड (CO2)चा वापर केला जातो. ही बंदूक तुम्ही स्वतः जवळ ठेवून, स्वतःचे रक्षण स्वतः करू शकता. ही बंदूक जवळ असल्यास तुम्हाला स्वरक्षणासाठी लोकांवर अवलंबून राहण्याची काहीच गरज नाहीये. नाही तर सध्या जे देशात सुरू आहे, ते कधीच थांबणार नाही.”
परवाना असण्याचीही गरज नाही – पाटनी
पुढे खुशबू पाटनी म्हणाली, “हे पिस्तूल साधारणपणे ६० ते ७० हजार रुपयांपर्यंत मिळते. घराजवळ आसपास सराव करून, तुम्ही त्याचा सहज वापरू शकता. त्यासाठी परवाना असण्याचीही गरज नाहीये.” स्वरक्षणासाठी मुलींना एअर पिस्तूल वापरण्याचा सल्ला खुशबू पाटनीने दिला असला तरी ती वापरताना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहनही तिने केले आहे.
तिने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “हे पिस्तूल कोणतेही खेळणे नसून, ते केवळ स्वसंरक्षणासाठी वापरावयाचे आहे. त्यामुळे ते खरे असो किंवा कॉपी असो, त्याचा वापर अत्यंत समंजसपणे आणि जबाबदारीने करणे आवश्यक आहे. हे 177 एअर पिस्तूल ‘ग्लॉक १७ जेन ४’ (Glock 17 Gen 4) आहे.”
