Shah Rukh Khan’s KING Movie : शाहरुख खानने मुलगा आर्यन खानने दिग्दर्शित केलेल्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’च्या प्रमोशनसाठी किती मेहनत घेतली होती हे साऱ्या जगाने पाहिलंय. हाताला दुखापत होऊन सुद्धा शाहरुख प्रीमियरला पोहोचला होता. आता आर्यन पाठोपाठ शाहरुख आपल्या लाडक्या लेकीसाठी मैदानात उतरणार आहे. सुहाना खानने ‘द आर्चिज’ सिनेमातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. मात्र, या चित्रपटाला म्हणावं तसं यश मिळालं नाही. याशिवाय सुहानाला ट्रोल देखील करण्यात आलं. त्यामुळे आता लेकीला नव्याने लाँच करण्यासाठी ‘किंग’ने स्वत: पुढाकार घेतला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून चाहते ‘किंग’ सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर २०२६ मध्ये हा चित्रपट तुमच्या भेटीला येईल असं सांगत शाहरुख खानने याची पहिली झलक सर्वांबरोबर शेअर केली आहे.

शाहरुखच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी या सिनेमाची पहिली झलक प्रदर्शित केल्याने सध्या SRK प्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. याशिवाय किंग खानचा सिनेमातील जबरदस्त डॅशिंग लूक पाहून चाहते देखील थक्क झाले आहेत.

किंग सिनेमाच्या पहिल्याच टीझरमध्ये शाहरुख म्हणतो, “किती खून केले आठवत नाही…ते लोक चांगले होते की वाईट? मी कधी विचारलं नाही. फक्त त्यांच्या डोळ्यात मृत्यू दिसत होता…आणि मी त्यामागचं कारण! हजारो गुन्हे केले, मी आहे बदनाम…जगाने दिलं मला एकच नाव किंग! ( दुनिया ने दिया मुझे एक ही नाम…. किंग ) डर नही दहशत हूँ!” या जबरदस्त संवादांनी प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतलं आहे.

दिग्दर्शक-निर्माता करण जोहरने ‘किंग’ सिनेमाची पहिली झलक इन्स्टाग्रामवर शेअर करत या चित्रपटाच्या संपूर्ण टीमवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. करण म्हणतो, “हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर शब्दापलीकडचं यश मिळवेल आणि आपला ‘किंग’ संपूर्ण जगावर राज्य करेल.”

शाहरुख यामध्ये ‘अंडरवर्ल्डचा किंग’ अशी भूमिका साकारत आहे; यामुळेच चित्रपटाचं नाव ‘किंग’ ठेवण्यात आलं आहे. शाहरुख-सुहानासह अभिनेत्री दीपिका पादुकोण यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

दरम्यान, शाहरुख व ‘किंग’च्या टीमकडून अद्याप या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही. प्रेक्षक आता या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे.