सोनम वांगचुक गेल्या काही दिवसांपासून उपोषणावर बसले असून आज त्यांच्या या उपोषणाला २० दिवस झाले आहेत. मात्र अद्याप केंद्र सरकारकडून कुठलीही हालचाल न झाल्याने आणि सोनम वांगचुक यांच्याशी कुठलाही संवाद न झाल्याने ते त्यांच्या उपोषणावर ठाम असून याचा त्यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम होत आहे. त्यांच्या काळजीपोटी विविध श्रेत्रातील मंडळी सोशल मीडियामार्फत त्यांना पाठिंबा देत हे उपोषण थांबवण्याची विनंती करत आहेत. अशातच आता दिग्दर्शिका किरण रावनेसुद्धा याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

गुरुवारी रात्री दिग्दर्शिका किरण राव यांनी अनेक शिक्षणतज्ज्ञ, कलाकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसह एका पत्रावर स्वाक्षरी करत वांगचुक यांनी उपोषण मागे घ्यावं, असं आवाहन केलं. त्याचबरोबर त्यांच्या मागण्यांवर केंद्र सरकारने अर्थपूर्ण चर्चा सुरू करावी, अशीही मागणी या पत्रातून करण्यात आली. पर्यावरण कार्यकर्ते आणि शिक्षण क्षेत्रातील सुधारक सोनम वांगचुक, ज्यांच्या आयुष्यापासून प्रेरणा घेऊन ‘३ इडियट्स’ चित्रपटातील रँचो हे लोकप्रिय पात्र साकारण्यात आल्याचं म्हटलं जातं, ते सध्या दिल्लीतील जंतर-मंतर येथे उपोषण करत आहेत.

किरण राव यांचा सोनम वांगचुक यांना पाठिंबा

नीट परिक्षेच्या(NEET) गैरप्रकारांविरोधात सोनम वांगचुक यांनी कॉक्रोच जनता पार्टीबरोबर हे आंदोलन सुरू केलं असून, त्यांच्या दीर्घकाळ चाललेल्या उपोषणामुळे देशभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. सोनम वांगचुक यांना पाठिंबा देणाऱ्या इतर सेलिब्रिटींप्रमाणेच किरण राव यांनीही त्यांच्या उपोषणादरम्यान खालावत चाललेल्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली. एकात्मता दर्शवण्यासाठी किरण राव यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील फोटोमध्येही बदल केला आहे. त्यांनी “I Support Sonam” (मी सोनम वांगचुक यांच्या पाठीशी आहे) असा संदेश असलेला सोनम वांगचुक यांचा फोटो प्रोफाइल फोटो म्हणून ठेवला आहे.

किरण राव यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं, “सोनम वांगचुक, अभिजीत दिपके, सीजेपी (CJP) आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या या देशातील लहान-मोठ्या सर्व नागरिकांसोबत मी ठामपणे उभी आहे. न्याय मिळावा यासाठी उपोषण करणाऱ्या सोनमजी, नेहा, मनीष, अमीन आणि इतर सर्वांना माझा सलाम. आम्हाला प्रत्येकाचा आवाज महत्त्वाचा असतो, याची जाणीव करून दिल्याबद्दल संपूर्ण देश तुमचा ऋणी आहे.” त्या पुढे म्हणाल्या, “१९ दिवस उलटूनही या उपोषणाकडे ज्या प्रकारे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं आहे, ते अत्यंत वेदनादायी आहे. सत्तेत असलेल्यांनी जनतेचा आवाज ऐकण्यासाठी आणखी काय घडण्याची वाट पाहायची आहे? हे धक्कादायक आणि चुकीचं आहे. आंदोलनकर्त्यांशी संवाद साधावा, विद्यार्थ्यांच्या वेदना समजून घ्याव्यात आणि हा तिढा सोडवावा, अशी माझी सरकारला विनंती आहे.” पोस्टच्या शेवटी त्यांनी #SonamWangchuk, #NEET आणि #CockroachJanataParty हे हॅशटॅगही वापरले

आमिर खाननेही दिली प्रतिक्रिया

किरण राव यांनी सोनम वांगचुक यांना पाठिंबा दिल्यानंतर, ‘३ इडियट्स’मधील रँचो हे लोकप्रिय पात्र सोनम वांगचुक यांच्या आयुष्यावर आधारित असल्याच्या अनेक वर्षांपासूनच्या समजुतीवर आमिर खानने नुकतंच स्पष्टीकरण दिलं. आमिर खान म्हणाला की, हे खरं नाहीये. २००९ मध्ये ‘३ इडियट्स’ चित्रपट तयार होत असताना ना त्यांना, ना चित्रपटाच्या लेखकांना सोनम वांगचुक यांच्याबद्दल माहिती होती. त्यामुळे रँचोचं पात्र त्यांच्या आयुष्यावर आधारित नव्हतं, असं आमिरने स्पष्ट केलं. मात्र, सोनम वांगचुक यांच्या खालावत चाललेल्या प्रकृतीबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आणि त्यांनी लवकरात लवकर उपोषण मागे घ्यावं, अशी आशाही व्यक्त केली.

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ बॉलीवूड कलाकार मैदानात

दिल्लीतील जंतर-मंतर येथे उपोषण करणारे शिक्षण सुधारणा कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ अनेक बॉलीवूड कलाकार आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर्स पुढे आले आहेत. नीट (NEET) परीक्षेतील पेपरफुटीप्रकरणी जबाबदारी निश्चित करणे, शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करणे आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागण्यांसाठी सोनम वांगचुक आंदोलन करत आहेत. या प्रकरणावर शांततापूर्ण तोडगा काढावा, अशी मागणी अनेकांनी केली आहे. तसंच, सरकारने सोनम वांगचुक यांच्याशी संवाद साधावा आणि त्यांच्या प्रकृतीचा विचार करून त्यांनीही उपोषण मागे घ्यावं, असं आवाहनही या सेलिब्रिटींनी केलं आहे.