Kishore Kumar Death Anniversary : किशोर कुमार यांनी बॉलीवूडचा एक काळ गाजवला असून, त्यांच्या आवाजाने हिंदी चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली. काळ बदलला, पिढ्या बदलल्या; पण किशोरदांच्या गाण्यांची जादू आजही कायम आहे. आनंद, प्रेम व विरह अशा अनेक भावना त्यांनी आपल्या आवाजातून जागवल्या. किशोर कुमार हे त्यांच्या गाण्यांबरोबरच हटके स्वभावामुळेही चर्चेत राहिले.

किशोर कुमार यांचे बॉलीवूडमधील अनेक किस्से चर्चेत असतात. एकदा एका सिनेमाच्या शूटिंगसाठी किशोर कुमार गाडी चालवत होते. सिनेमाच्या दिग्दर्शकांनी त्यांना काही अंतरापर्यंत गाडी चालवून परत येण्यास सांगितले होते; पण किशोर कुमार हे गाडी घेऊन गेले आणि बराच वेळ झाला तरी ते परत आले नाहीत. दुसऱ्या दिवशी समजलं की, शूटिंग सुरू असतानाच किशोरदा कार घेऊन खंडाळ्याच्या दिशेनं निघून गेले होते.

किशोर कुमार घरात ठेवत असत कवट्या आणि हाडं

किशोर कुमार यांच्या आयुष्यातील आणखी एक किस्सा प्रसिद्ध आहे. ते आपल्या घरात कवट्या आणि हाडे ठेवत असत. त्यांचा मुलगा व गायक अमित कुमार यांनीही याबद्दल सांगितलं होतं. विकी लालवानी यांना दिलेल्या मुलाखतीत अमित कुमार यांनी सांगितलेले की, त्यांचे वडील पूर्व आफ्रिकेतील नैरोबी येथे कार्यक्रमासाठी गेले होते. तिथून ते कवट्या आणि हाडं घेऊन आले होते. या वस्तू आजही ट्रस्टमध्ये जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. अमित कुमार यांच्या म्हणण्यानुसार, किशोर कुमार यांना अशा गोष्टी गोळा करण्याचा छंद होता.

किशोर कुमार यांनी केली होती चार लग्नं

किशोर कुमार यांचं वैयक्तिक आयुष्यही नेहमीच चर्चेत राहिलं. त्यांनी एक-दोन नव्हे, तर चार लग्नं केली होती. १९५० मध्ये त्यांनी बंगाली गायिका व अभिनेत्री रुमा गुहा ठाकुरता यांच्याशी पहिलं लग्न केलं. या दोघांना अमित कुमार हा मुलगा झाला. मात्र, सात वर्षांनंतर १९५८ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर १९६० मध्ये किशोर कुमार यांनी ज्येष्ठ अभिनेत्री मधुबाला यांच्याशी दुसरं लग्न केलं. त्यांचं नातं नऊ वर्षं टिकलं. १९६९ मध्ये आजारपणामुळे मधुबाला यांचं निधन झालं.

किशोर कुमार

मधुबाला यांच्या निधनानंतर किशोर कुमार यांनी १९७६ मध्ये अभिनेत्री योगिता बाली यांच्याशी तिसरं लग्न केलं; मात्र हे नातंही फार काळ टिकलं नाही. १९७८ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर १९८० मध्ये किशोर कुमार यांनी स्वतःपेक्षा २७ वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्री लीना चंदावरकर यांच्याशी चौथं लग्न केलं. त्यानंतर १३ ऑक्टोबर १९८७ रोजी किशोर कुमार यांनी या जगाचा निरोप घेतला. आपल्या आवाजानं अनेक पिढ्यांच्या मनावर राज्य करणारे किशोरदा आजही त्यांच्या अजरामर गाण्यांमुळे चाहत्यांच्या लक्षात आहेत.