Kishore Kumar Bungalow Virat Kohli restaurant : बॉलीवूडमध्ये आपल्या दमदार आवाजाने स्वतंत्र ओळख निर्माण करणारे गायक किशोर कुमार यांनी सिनेविश्वामध्ये एक काळ गाजवला आहे. आज ते हयात नसले तरी त्यांच्या गाण्यांमधून ते चाहत्यांच्या मनात कायम जिवंत असल्याचे जाणवते. काळ बदलला, पिढ्या बदलल्या; पण किशोर कुमार यांच्या आवाजातील जादू कधीच कमी झाली नाही. सदाबहार गाणी गाणारे दिग्गज गायक किशोर कुमार यांचा मुंबईमध्ये आलिशान बंगला आहे, आता या बंगल्याच्या माध्यमातून लोकप्रिय भारतीय क्रिकेटपटू कोट्यवधी रुपये कमावत आहे.

किशोर कुमार यांची मुंबईमध्ये विविध ठिकाणी प्रॉपर्टी होती. त्यामध्ये त्यांच्या जुहू परिसरामधील आलिशान बंगल्याचा समावेश आहे. पण, काही वर्षांपूर्वी टीम इंडियाचा फलंदाज विराट कोहलीने किशोरदा यांच्या या आलिशान बंगल्याचा काही भाग भाड्याने घेतला. सध्या बंगल्यातील ‘त्या’ भागाच्या माध्यमातून विराट कोट्यवधींची कमाई करीत आहे. जुहू परिसरातील या बंगल्याचे नाव ‘गौरी कुंज’, असे आहे.

विराट कोहलीचे ‘वन ८ कम्यून’ रेस्टॉरंट

किशोर कुमार यांच्या बंगल्याचा विराट कोहलीशी झालेला हा लीज करार हा २०२७ पर्यंत राहणार आहे. याच भाड्याने घेतलेल्या भागामध्ये विराटने त्याचे रेस्टॉरंट सुरू केले आहे. विराटच्या ‘वन ८ कम्यून’ या रेस्टॉरंटची शाखा येथे सुरू करण्यात आली असून, त्यामधून विराट कोहली कोट्यवधींची कमाई करीत आहे. या रेस्टॉरंटमध्ये नेहमीच बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांची वर्दळ पाहायला मिळते. परंतु, या बंगल्यातील काही भाग भाड्याने मिळविण्यासाठी विराटने नेमकी किती रक्कम मोजली, याची अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही.

किशोर कुमार यांनी या बंगल्याचं नाव आपल्या आई गौरी देवी आणि वडील कुंजलाल गांगुली यांच्या नावावरून ‘गौरी कुंज’, असं ठेवलं होतं. हा बंगला त्यांच्यासाठी केवळ घर नव्हतं, तर त्यांच्यासाठी कामाची एक खास जागा आणि शांतता लाभण्याचं एक खास ठिकाण होतं. अत्यंत प्रशस्त असा हा बंगला असून याच्या सर्व बाजूंनी झाडं-झुडपांच्या लागवडीतून सुंदर अशी बाग तयार करण्यात आली आहे. या बागेमध्ये किशोर कुमार यांनी अनेकदा निवांत वेळ व्यतीत केला आहे.

किशोर कुमारांसाठी ‘गौरी कुंज’ नेहमीच खास

किशोर कुमार यांचा हा बंगला बॉलीवूडच्या अनेक गप्पा आणि मैफिलींचा साक्षीदार ठरला आहे. या बंगल्यामध्ये बसून अनेकदा ते त्यांच्या गाण्यावर काम करीत असत. तसेच मित्रांबरोबर निवांत गप्पा मारत असत. किशोर कुमार हे या बंगल्यामध्ये त्यांचं शांत, साधं आणि गॅमरपासून वेगळं असं आयुष्य जगत होते. त्यामुळे हा ‘गौरी कुंज’ बंगला नेहमीच त्यांच्यासाठी खास राहिला होता.

बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर किशोरदा यांचा खास फलक

या बंगल्यातील एका भागामध्ये आता विराट कोहलीने त्याचे हॉटेल सुरू केले आहे. ‘वन ८ कम्यून’, असे या रेस्टारंटचे नाव असून, विराटच्या जर्सी नंबरवरून या हॉटेलचे नाव ठेवण्यात आले आहे. जुन्या एका मुलाखतीमध्ये किशोर कुमार यांनी या हॉटेलच्या आठवणी सांगितल्या होत्या. ‘गौरी कुंज’च्या बागेतील झाडे हेच खरे सोबती होते. ते अनेकदा एकांतात झाडांमध्ये शांतपणे वेळ घालवत असत. खासगी आयुष्याला महत्त्व देणाऱ्या किशोर कुमार यांनी बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक आगळावेगळा फलकही लावला होता. त्यावर लिहिलं होतं, “किशोरपासून सावध राहा.” त्यामुळे हा बंगला किशोर कुमार यांच्यासाठी खास राहिला होता. त्यानंतर आता अनेक जण ‘गौरी कुंज’मधील विराट कोहलीच्या रेस्टॉरंटमध्ये किशोरदा यांच्या आठवणींना उजाळा देत असतात.