१९८७ मध्ये शेखर कपूर दिग्दर्शित मि. इंडिया हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट साय-फाय क्लासिक चित्रपट आहे आणि त्या काळातल्या बच्चे कंपनीसह अबाल वृद्धांना हा चित्रपट फारच आवडला होता. शिवाय या चित्रपटाशी जोडली गेलेली अजून एक बाब म्हणजे सलीम-जावेद हे लेखक या चित्रपटानंतर वेगळे झाले. चित्रपटातला अमरिश पुरींनी साकारलेला मोगॅम्बो आजही लोकांच्या स्मरणात आहे. तसंच काँटे नहीं कटते हे गाणं आणि हवा हवाई हे गाणंही लोकांच्या तोंडी असतं. आलिशा चिनायने काँटे नहीं कटते हे गाणं म्हटलं होतं. किशोर कुमार यांच्यासह गाणं रेकॉर्ड करत असतानाच्या आठवणी आलिशाने सांगितल्या.
काय म्हणाली आलिशा चिनॉय?
आलिशा म्हणाली, मी तेव्हा २१ किंवा २२ वर्षांची असेन. मी रेकॉर्डिंग स्टुडिओत आले. मला किशोर कुमार यांच्यासह गाणं गायचं होतं. किशोर कुमार हे त्यावेळी माझ्या दुप्पट किंवा तिप्पट वयाचे असावेत. लक्ष्मीकांत प्यारेलाल तिथे होते. त्यावेळी मला काय गायचं आहे हेच मी विसरले. किशोर कुमार त्यांच्या खास अंदाज मज्जा मस्ती कर होते. मी त्यांच्यासह गाणं म्हणायला आले आहे याकडे त्यांनी फारसं लक्ष दिलं नाही. माझ्याकडे तर त्यांनी पाहिलंही नाही.
आलिशा म्हणाली की मी स्वतःला खूप भाग्यवान समजते
आलिशा एका मुलाखतीत ही आठवण सांगताना पुढे म्हणाली, मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मला किशोरदांसह गाता आलं. मी बप्पी लहिरींसह एक गाणं केलं होतं. माझं ते गाणं पूर्ण झाल्यानंतर मला शेखर कपूर यांच्या ऑफिसमधून फोन आला. त्यांनी मला सांगितलं की तुला काँटे नहीं कटते हे गाणं म्हणायचं आहे. मी जेव्हा रेकॉर्डिंगसाठी गेले तेव्हा शेखर कपूरही तिथे होते. त्यावेळी त्यांनी सांगितलं किशोर कुमार आणि तू असं हे द्वंद्व गीत आहे.
काँटे नहीं कटते दिन ये रात हे गाणं शृंगारसाचं होतं-आलिशा चिनॉय
काँटे नहीं कटते दिन ये रात हे गाणं खूपच दमदार आणि प्रियकर प्रेयसीतलं शरिरीक आकर्षण दाखवणं गाणं होतं. मिस्टर इंडिया अदृश्य आहे आणि त्याला कल्पनेत आणून ती नायिका गाणं म्हणते आहे असं त्या गाण्याचं चित्रीकरण होतं. मी गाणं विसरले होते पण किशोरदा तिथे होते, लक्ष्मीकांत प्यारेलाल होते. मी ते गाणं तिथल्या प्रचंड सकारात्मक उर्जेमुळे गाऊ शकले. मी चांगलं गाऊ शकले कारण मला त्या सगळ्याच वरिष्ठ मंडळींनी सांभाळून घेतलं असं आलिशा चिनॉयने सांगितलं.
किशोर कुमार हसत खेळत होते पण एक शब्दही बोलले नाहीत
तसंच पुढे आलिशा म्हणाली मी आणि किशोर कुमार एकाच रेकॉर्डिंग रुममध्ये होतो. लक्ष्मीकांतजींनी माझी किशोर कुमार यांना ओळख करुन दिली. ते म्हणाले किशोर, ही नवी गायिका आहे आणि ही तुझ्या बरोबर गाणं म्हणणार आहे. किशोर कुमार यांनी एक भुवया उंचावून माझ्याकडे नुसतं पाहिलं एक शब्दही बोलले नाहीत. मात्र त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्न होता की ही काय गाणं म्हणणार? त्यानंतर ते त्यांची मजा मस्ती करु लागले. हास्यविनोद सुरु झाले. मी माझ्या कामावर लक्ष केंद्रीत करत होते. आमच्यात कुठलाही असा संवाद झाला नाही जो काहीसा मूर्खपणाचा वाटेल. माईकपुढे जाईपर्यंत किशोर कुमार त्यांच्या त्यांच्या खास अंदाजात वावरत होते. त्यानंतर आम्ही गाणं गायलं. किशोर कुमार एक शब्दही न बोलता तिथून निघून गेले. त्यांना माझं गाणं कसं वाटलं यावर त्यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. आम्हाला एकमेकांशी संवाद साधायची संधीच मिळाली नाही कारण ते पटकन निघून गेले अशी आठवण आलिशाने सांगितली.
