सुप्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगर श्रॉफ हा त्याच्या अभिनयाबरोबरच त्याच्या फिटनेससाठी आणि डान्ससाठी ओळखला जातो. आज त्याचा वाढदिवस आहे. तो एक स्टारकिड असूनही त्याने मनोरंजन सृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या पदर्पणच्या वेळी त्याच्या नावाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. पण ‘टायगर’ हे त्याचं खरं नाव नाही.
लहान असल्यापासूनच टायगरने मार्शल आर्टचं प्रशिक्षण घेतलं होतं. तर त्याने त्याचं शिक्षण अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बेमधून पूर्ण केलं. पुढे काही वर्षांनी त्याने ‘हिरोपंती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. जेव्हा त्याने बॉलिवूडमध्ये येण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याने त्याचं नाव बदलण्याचाही निर्णय घेतला.
आणखी वाचा : “घर गहाण ठेवलं, जमिनीवर झोपण्याची वेळ…” जॅकी श्रॉफ यांची पत्नी भावूक
टायगर हे त्याचं मूळ नाव नाही. त्याला घरात टायगर या नावाने हाक मारली जायची. त्यामुळेच बॉलिवूडमध्ये येताना त्याने हेच नाव कायम ठेवलं. त्याचं मूळ नाव जय हेमंत श्रॉफ असं आहे. लहानपणापासून मनोरंजन सृष्टीत पाऊल टाकेपर्यंत तो हेच नाव लावायचा.
प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफचा मुलगा असला तरी टायगरला बॉलिवूडमध्ये सहज प्रवेश मिळाला नाही. त्याला अनेक कटू प्रसंगांनाही सामोरं जावं लागलं होतं. सुरुवातीच्या काळात त्याच्या दिसण्यावरून त्याला चांगलंच ट्रोल करण्यात आलं होतं. पण आज त्याने स्वतःला सिद्ध करत लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत त्याचं स्थान निश्चित केलं आहे.