Koffee With Karan Season 9 End Announcement: करण जोहरचा लोकप्रिय ‘कॉफी विथ करण’ हा शो तब्बल दोन दशकांनंतर प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. बॉलीवूडच्या कलाकारांचे गॉसिप, वाद आणि खुलासे यामुळे हा शो नेहमीच चर्चेत राहिला आहे. आता करण जोहर ‘कॉफी विथ करण’ या शोचा शेवटचा ९ वा सिझन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे जाहीर झाले आहे. पण, शोमध्ये काही कलाकारांनी केलेले वक्तव्य, दिलेली उत्तरे आणि त्यावरून झालेले वाद हे आयकॉनिक ठरले आहेत.
कंगना रणौत यांचे नेपोटिझमवर वक्तव्य
बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत या सीझन ५ मध्ये सैफ अली खानबरोबर कॉफी विथ करणमध्ये सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी बॉलीवूडच्या नेपोटिझमवर परखड मत व्यक्त केले होते. त्या करण जोहरला मूव्ही माफिया म्हणाल्या होत्या. कंगना रणौत यांच्या वक्तव्यामुळे मोठा गदारोळ झाला होता आणि यामुळे बॉलीवूडमधील नेपोटिझमचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला होता. या वक्तव्यानंतर करण जोहर व कंगना रणौत यांच्यातील वाद समोर आला होता.
सोनम व दीपिका यांनी रणबीर कपूरबाबत केलेले वक्तव्य
‘कॉफी विथ करण’च्या तिसऱ्या सीझनमध्ये दीपिका पादुकोण आणि सोनम कपूर एकत्र सहभागी झाल्या होत्या. यावेळी दीपिकाने तिचा तेव्हाचा बॉयफ्रेंड रणबीर कपूरबद्दल भाष्य केलं. शोदरम्यान दीपिका आणि सोनमने रणबीरची खिल्ली उडवत त्याने कंडोम ब्रँडची जाहिरात करावी, अशी टिप्पणी केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर रणबीरचे वडील आणि दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनीही प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी दीपिका आणि सोनमच्या या वक्तव्यांवर नाराजी व्यक्त करत त्यांच्यावर टीका केली होती.
करीना कपूर विरुद्ध प्रियांका चोप्रा
‘कॉफी विथ करण’च्या सीझन ३मध्ये आणखी एक चर्चेत राहिलेला सेलिब्रिटी वाद पाहायला मिळाला होता. करीना कपूर खानने प्रियांका चोप्रा जोनसवर निशाणा साधत एका सेगमेंटमध्ये विचारलं होतं, “तिला हा ॲक्सेंट कुठून मिळाला?” त्यानंतर प्रियांका शोमध्ये आली तेव्हा तिला करीनाच्या या प्रश्नाबद्दल विचारण्यात आलं. यावर प्रियांकाने उत्तर दिलं, “जिथून तिच्या बॉयफ्रेंडला (सैफ अली खान) मिळाला, तिथून.” मात्र, नंतर दोन्ही अभिनेत्रींचे मतभेद दूर झाले आणि ‘कॉफी विथ करण’च्या पुढील सीझनमध्ये त्या एकत्र दिसल्या होत्या.
आलिया भट्टचे राष्ट्रपती कोण याबाबत वक्तव्य
आलिया भट्ट ‘कॉफी विथ करण’मध्ये पहिल्यांदा आली होती, त्यावेळी तिने प्रेसिडंटबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. रॅपिड फायर राऊंडदरम्यान आलिया भट्ट ‘पृथ्वीराज चौहान’ यांना भारताचे राष्ट्रपती म्हणाली होती. त्यावेळी भारताचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी होते. आलियाच्या या चुकीमुळे सोशल मीडियावर तिचे अनेक मीम्स व्हायरल झाले आणि पापाराझींनी याबाबत विचारल्यानंतर आलियाला प्रचंड राग आल्याचे दिसून आले होते.
इमरान हाश्मी ऐश्वर्या रायला म्हणालेला प्लास्टिक
‘कॉफी विथ करण’च्या सीझन ४मध्ये इमरान हाश्मीच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण केला होता. रॅपिड फायर राऊंडदरम्यान त्याने ‘प्लास्टिक’ हा शब्द ऐश्वर्या राय बच्चन यांच्या नावाशी जोडला होता. याशिवाय त्याने मल्लिका शेरावतला ‘ओव्हररेटेड’ म्हटलं होतं. काही वर्षांनंतर इमरानने या वक्तव्यांबद्दल खंत व्यक्त केली होती.
