मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये नावाजलेलं नाव म्हणजे सचिन पिळगावकर. सचिन यांनी आजवर चित्रपटसृष्टीला दिलेलं योगदान अमुल्य आहे. त्यांचे चित्रपट आजही प्रेक्षक आवडीने पाहतात. जवळपास ५० वर्षांहून अधिक काळ ते चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत आहेत. सचिन त्यांच्या मुलीसह मराठी ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाच्या मंचावर हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमामध्ये इतर विषयांवरही गप्पा रंगताना दिसतील.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालक सचिन खेडेकर सचिन यांना अनेक प्रश्न विचारताना दिसतील. दरम्यान सचिन यांना सचिन खेडेकर अमिताभ बच्चन यांच्याबाबत एक प्रश्न विचारताना दिसतात. कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये याची झलक पाहायला मिळते. “तुम्ही केलेलं काम, इतक्या वर्षांचं करिअर… यामध्ये प्रेक्षक असं म्हणतात खरं तर तुम्ही अमिताभ बच्चन यांनाही सिनिअर आहात”. असं सचिन खेडेकर यांनी सचिन पिळगावकर यांना विचारलं.




आणखी वाचा – दोन विवाहित अभिनेत्यांबरोबर होतं श्रीदेवी यांचं अफेअर, दोघांच्याही पत्नींना कळलं अन्…
यावर सचिन पिळगावकर यांनीही दिलेलं उत्तर कौतुकास्पद आहे. त्यांनी अमिताभ यांचाही यावेळी उल्लेख केला. ते म्हणाले, “परमेश्वराची कृपा आहे. असं मी समजतो की, सिनिअर असणं हे ठिक आहेच. पण त्याचबरोबरीने तुम्ही काय काम करता?, किती वर्षांमध्ये करता किंवा दहा वर्षांमध्ये काम करता, काम करणं महत्त्वाचं आहे. वर्ष महत्त्वाची नाही असं मला वाटतं आणि हे फक्त मलाच नाही अमिताभ यांनाही वाटतं”.
‘शोले’ चित्रपटामध्ये सचिन यांनी केलेल्या कामामुळे अमिताभ बच्चन प्रभावित झाले होते. त्यांनी सचिन यांच्या कामाचंही कौतुक केलं होतं. ‘शोले’च्या चित्रीकरणादरम्यान अमिताभ यांनी सचिन यांना विचारलं होतं की, “तू किती चित्रपटात काम केलं आहेस?” यावर “जवळपास ६० चित्रपटात”. असं त्यांनी उत्तर दिलं. सचिन यांचं उत्तर ऐकूनच अमिताभ यांच्या मनात त्यांच्याबाबतचा आदर वाढला होता.