Konkona Sen Sharma Horror Movie: हिंदी कलाविश्वामध्ये आपल्या अभिनय आणि सौंदर्याने वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे कोंकणा सेन शर्मा. तिने अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये स्वतंत्र ओळख निर्माण केली असून तिचा मोठा चाहता वर्ग आहे. बॉलीवूडमधील करिअरमध्ये तिने विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तिचा सहजसुंदर आणि प्रभावी अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. अभिनयाबरोबरच कोंकणाने दिग्दर्शक म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिला हॉरर सिनेमा बनवण्याची इच्छा असूनही तिला त्यावर काम करताना अनेकदा भीती वाटत असल्याची कबुली अभिनेत्रीने दिली आहे.

कोंकणा सेन शर्माने ‘एक थी डायन’सारख्या हॉरर चित्रपटात काम केले आहे. तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. यानंतर तिने ‘अ डेथ इन द गुंज’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. हा देखील एक थ्रिलर सिनेमा होता. हा तिचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट असला तरी त्यातील भीतीदायक सीनमुळे कोंकणाला भीती वाटत असल्याचा अनुभव तिने सांगितला आहे. तसेच अजूनही तिच्याकडे एका हॉरर सिनेमाची कल्पना असल्याचे कोंकणाने सांगितले आहे.

हॉरर मला आवडते पण… – कोंकणा

कोंकणा सेन शर्मा म्हणाली, “हॉरर या प्रकारातील सिनेमे मला नेहमीच आवडतात, हा जॉनर मला खूप रंजक वाटतो, पण माझ्या पहिल्याच चित्रपटातील रात्रीच्या भीतीदायक सीनचं लेखन करताना मला भीती वाटत होती. त्यावेळी आरशात स्वतःचं प्रतिबिंब पाहूनही मला अनेकदा भीती वाटत होती. हॉरर मला आवडते, पण मी जेव्हा अशा कथा लिहिते, तेव्हा मलाच खूप भीती वाटते, त्यामुळे खूप वेळा चांगले हॉरर सिनेमा मी पाहू शकत नाही. कारण त्याचा माझ्या मनावर खूप काळ तसाच प्रभाव राहतो.”

पुढे ती म्हणाली, दिग्दर्शक म्हणून अजूनही माझ्या मनात एका भयपटाची कल्पना आहे. मातृत्वावर आधारित सायकोलॉजिकल हॉरर चित्रपट बनवण्याची माझी इच्छा आहे. या कथेवर मी खूप दिवसांपासून विचार करत आहे; पण अजून त्यावर लिखाण सुरू केलेलं नाही. या कथेचे सर्व क्रिएटिव्ह हक्क मला माझ्याकडेच ठेवायचे आहेत, त्यामुळे अजून कोणत्याही स्टुडिओ किंवा निर्मात्याशी चर्चा केलेली नाही. मी निर्मात्यांकडून पैसे घेऊन पटकथा लिहिणार नाही, कारण त्यामुळे आपली कल्पना असूनही कथा त्यांची होते, त्यामुळे आता माझ्या डोक्यात कल्पना असून मला थोडा वेळ मिळाला की मी स्वतः त्यावर लिहिणार आहे.”

कोंकणा सेन शर्माने हिंदी आणि बंगाली चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने ‘मिस्टर अँड मिसेस अय्यर’, ‘ओंकारा’, ‘लाईफ इन अ… मेट्रो’, ‘वेक अप सिड’ आणि ‘लक बाय चान्स’ अशा अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनयाबरोबरच तिने दिग्दर्शनातही पाऊल टाकत २०१७ मध्ये ‘अ डेथ इन द गुंज’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. यानंतर तिने ‘द मिरर’ या शॉर्टफिल्मचे दिग्दर्शन केले आहे.