Kriti Sanon Talks About calorie-deficit diet : क्रिती सेनॉन सध्या तिच्या ‘कॉकटेल २’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे.  यामध्ये तिच्यासह शाहीद कपूर व रश्मिका मंदानासुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेतून झळकणार आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी क्रिती सेनॉने खूप मेहनत घेतली असल्याचं तिने म्हटलं आहे.

अनेकदा कलाकार मंडळी त्यांच्या चित्रपटातील भूमिकांसाठी मेहनत घेत असतात, पात्रानुसार वजन वाढवणे, घटवणे या गोष्टी करत असतात. तर स्क्रीनवर चांगलं दिसण्यासाठी त्यांना दैनंदिन जीवनातही व्यायाम आणि डाएट या गोष्टी फॉलो कराव्या लागतात. बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉननेही तिच्या आगामी चित्रपटासाठी डाएट केल्याचं म्हटलं आहे. क्रितीने या भूमिकेसाठी नेमकं कोणत्या प्रकारचं डाएट केलं आहे आणि ती काय म्हणाली याबद्दल जाणून घेऊयात…

‘कॉकटेल २’साठी घटवलं वजन

क्रिती तिच्या डाएटबद्दल म्हणाली, “कॉकटेलसाठी मी खूप कडक डाएट आणि नियमित वर्कआउट केलं. पहिल्यांदाच मी कॅलरी कमी असलेला डाएट केला. माझ्या आयुष्यात असं कधी झालं नव्हतं. इटलीमध्ये पास्ता, पिझ्झा समोर असताना मी ते खाऊ शकत नव्हते.” असं तिने सोफी चौधरीशी संवाद साधताना सांगितलं आहे.

‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार ठाणे येथील (KIMS Hospitals)च्या मुख्य आहारतज्ज्ञ, अमरीन शेख  यांनी सांगितले की कॅलरी डेफिसिट म्हणजे शरीरात जितक्या कॅलरी बर्न होतात त्यापेक्षा कमी कॅलरी घेणे. वजन कमी करण्यासाठी हा एक महत्त्वाचा उपाय मानला जातो.

त्या म्हणाल्या, “योग्य पद्धतीने केल्यास हा उपाय परिणामकारक आणि टिकाऊ ठरू शकतो. मात्र, कॅलरी कमी कशा केल्या जातात हे महत्त्वाचं आहे. खूप जास्त बंधने घातल्यास थकवा, लक्ष न लागणे, हार्मोन्सचा असमतोल आणि स्नायू कमी होण्यासारख्या समस्या होऊ शकतात. योग्य कॅलरी डेफिसिट मध्यम प्रमाणात, पोषणयुक्त आणि व्यक्तीच्या जीवनशैली व ऊर्जा गरजेनुसार असायला हवा. तो अतिशय कडक नसावा.”

आहारतज्ज्ञ पुढे म्हणाल्या, “सर्वात मोठी चूक म्हणजे ‘कमी खाणे’ आणि ‘योग्य खाणे’ यात गोंधळ करणे. अनेकजण पोषणाचा विचार न करता खूप कॅलरी कमी करतात. जेवण टाळणे, कार्बोहायड्रेटसारखे पूर्ण अन्नगट बंद करणे याचा उलटा परिणाम होऊ शकतो. आणखी एक सामान्य चूक म्हणजे सातत्य न ठेवणे. काही दिवस खूप कडक डाएट करून पुन्हा जुन्या सवयींकडे वळणे. यामुळे मेटाबॉलिझम मंदावू शकतो आणि दीर्घकाळ वजन नियंत्रणात ठेवणे कठीण होऊ शकते. तसेच पुरेसे पाणी पिणे, चांगली झोप आणि ताण नियंत्रण याकडे अनेकदा दुर्लक्ष होते, पण चांगल्या परिणामांसाठी या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत.”