Kriti Sanon Kangana Ranaut Raksha Bandhan Ad Controversy: बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन ही तिच्या रक्षाबंधनाच्या जाहिरातीवरून वादामध्ये अडकली आहे. एका दागिन्याच्या ब्रँडसाठी केलेल्या या जाहिरातीमध्ये क्रितीने ब्रालेट स्टाइल ब्लाऊज परिधान केल्याने नाराजी व्यक्त केली जात होती. खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांनी कपड्यांवरून क्रितीवर निशाणा साधला होता. जाहिरातीमुळे प्रचंड ट्रोल झाल्यानंतर क्रिती सेनॉनने इन्स्टाग्रामवर प्रतिक्रिया दिली आहे. मुलींनी काय कपडे घालावेत हे सांगणे आपण कधी थांबवणार आहोत? असा प्रश्न क्रिती सेनॉनने उपस्थित केला आहे.

रक्षाबंधनाच्या जाहिरातीमुळे चर्चेत आलेल्या क्रिती सेनॉनवर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला गेला. कंगना रणौत यांनीही, ‘तुम्ही तुमच्या भावाला बिकिनी किंवा अंतर्वस्त्रांमध्ये राखी का बांधाल?’ असा प्रश्न विचारला. सोशल मीडियावर गदारोळ झाल्यानंतर क्रितीने स्वतः इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत यावर प्रतिक्रिया दिली. रक्षाबंधन सण तिच्यासाठी नेहमीच खास असल्याचे सांगितले. तसेच महिलांच्या कपड्यांवर टीका करणाऱ्यांना क्रितीने उत्तर दिले आहे.

काय म्हणाली क्रिती सेनॉन?

क्रिती सेनॉनने जाहिरातीच्या वादावर प्रतिक्रिया देत लिहिलं, “सणांचा खरा अर्थ तुम्ही नेमकं कसे कपडे घालता यात नसून, त्या परंपरेबद्दल तुमच्या मनात असलेल्या भावना आणि नात्यांमध्ये असतो. रक्षाबंधन हे संरक्षणाचं नातं आहे. माझी बहीण आणि मी एकमेकींना राखी बांधतो. भाऊ जसा आपल्या बहिणीचं रक्षण करू शकतो, तसंच आम्हीही एकमेकींचं तितकंच रक्षण करू शकतो, याची आम्हाला जाणीव आहे. आम्ही बहिणी एकमेकींच्या आरोग्यासाठी, आनंदासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो. आमच्यासाठी ही प्रार्थना आणि हेच वचन आमच्या श्वानासाठीसुद्धा आहे, कारण शेवटी तोही आमच्या कुटुंबाचाच भाग आहे.”

क्रितीचे कंगना रणौत यांना सडेतोड उत्तर

क्रिती सेनॉनने पुढे कंगना रणौत यांच्या कपड्यांवरील टीकेवर उत्तर दिलं. तिनं लिहिलं, “स्त्रियांनी काय कपडे घालावेत हे सांगणे आपण कधी थांबवणार आहोत? काळाच्या ओघात ‘एथनिक फॅशन’मध्ये (पारंपरिक वेशभूषेत) खूप बदल झाले आहेत, तरीही एखाद्या स्त्रीचा तिच्या सणांबद्दल असलेला आदर फक्त तिने कसे कपडे परिधान केले आहेत यावरून पाहिला जातो. संस्कृती आणि परंपरांविषयी आदर तिच्या मनामध्ये असतो, तिच्या कपड्यांच्या गळ्याच्या डिझाइनमध्ये नाही.”

क्रिती सेनॉनची इन्स्टाग्राम पोस्ट

कंगना रणौत काय म्हणाल्या?

कंगना यांनी इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये क्रिती सेनॉनचे थेट नाव न घेता जाहिरातीतील कपड्यांवरून भाष्य केलं. त्यांनी लिहिलं, “महिलांसाठी हा खूप चांगला काळ आहे, आपल्या कपाटात वेगवेगळ्या कपड्यांचे अनेक पर्याय आहेत. आजची महिला ही जागतिक महिला आहे. कॉकटेल ड्रेसेसपासून ते लहेंगा चोळी, जीन्स ते साडी आणि बिकिनीपासून ते सलवार कमीजपर्यंतचे अनेक पर्याय आज उपलब्ध असताना, तुम्ही तुमच्या भावाला बिकिनी किंवा अंतर्वस्त्रांमध्ये राखी का बांधाल? तुमचे इतर स्टायलिंगचे पर्याय कुठे गेले? ही जाहिरात हेतूपूर्वक विचित्र आणि संशयास्पद वाटत आहे.”

नेमकं प्रकरण काय?

क्रिती सेनॉन नुकतीच एका ज्वेलरी ब्रँडच्या रक्षाबंधनच्या जाहिरातीत दिसली होती. या जाहिरातीत सण साजरा करताना तिने ऑफ-व्हाइट रंगाचा ब्रॅलेट-स्टाईल ब्लाऊज, त्यावर केप आणि ड्रेप्ड स्कर्ट परिधान केला होता. सोशल मीडियावरील एका वर्गाने या ब्रँडवर भारतीय सणांची चेष्टा केल्याचा आरोप केला, तर काहींनी क्रितीच्या कपड्यांचं वर्णन अतिशय तोकडे असं केलं. यानंतर कंगना रणौत यांनीही या वादात उडी घेतल्यानंतर क्रिती सेनॉनने सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे.