Kriti Sanon Giva Ad Controversy Founder Statement: क्रिती सेनॉनच्या रक्षाबंधनानिमित्त ‘जीवा’ ब्रॅण्डने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमुळे मोठा वाद निर्माण झाला. त्यातील क्रितीनं परिधान केलेल्या ब्रालेट स्टाईल टॉपवर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंग झाल्यानंतर क्रितीची जाहिरात हटविण्याचा निर्णय कंपनीनं घेतला. मात्र, जाहिरात का हटवली याचं नेमकं कारण ‘जीवा’ कंपनीचे संस्थापक ईशेंद्र अग्रवाल यांनी सांगितलं आहे.
रक्षाबंधनाच्या वादग्रस्त जाहिरातीमुळे ‘जीवा’ कंपनीच्या स्टोअरमध्येदेखील काही ठिकाणी आंदोलन करण्यात आली. सोशल मीडियावर क्रितीला ट्रोल करण्यात आलं आणि तिचा तीव्र निषेध करण्यात आला. या प्रकारामुळे दिलगिरी व्यक्त करीत ‘जीवा’नं ती जाहिरात सर्व माध्यमांवरून हटविण्यात येत असल्याचं जाहीर केलं. पण, जाहिरातीचा विचार आणि संदेश योग्यच असून, फक्त कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेत असल्याचं ‘जीवा’ कंपनीच्या संस्थापकांनी सांगितलं आहे.
काय म्हणाले ‘जीवा’चे ईशेंद्र अग्रवाल?
इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत ईशेंद्र अग्रवाल यांनी जाहिरातीचा हेतू आणि त्यातील संदेश योग्य असल्याचं म्हणत जाहिरात मागे घेण्याचं खरं कारण सांगितलं. त्यांनी लिहिलं, “क्रितीबरोबर आम्ही रक्षाबंधनाचं जे कॅम्पेन केलं त्याबाबत सुरू असलेल्या चर्चांकडे माझं लक्ष आहे. विशेषतः त्या जाहिरातीतून जो संदेश देण्यात आला होता, त्याला पूर्ण पाठिंबा दिलेला नाही, अशी भावना व्यक्त केली जात आहे. पण मला हे सांगायचं आहे की, या कॅम्पेनचा जो उद्देश होता, त्यावर आमचा आजही पूर्ण विश्वास आहे.”
पुढे त्यांनी लिहिलं, “ही जाहिरात क्रितीबरोबरील सहकार्यानं तयार करण्यात आली होती. त्याचा उद्देश कुटुंबातील सर्व जण आनंदानं जवळ येतील आणि एकत्र सण साजरा करतील, असाच होता. या मोहिमेचा उद्देश आणि त्यामागे असणारी भावना याबाबत आम्ही आजही क्रितीच्या मताशी पूर्णपणे सहमत आहोत.”
नेमकी का हटवली जाहिरात?
पुढे ईशेंद्र अग्रवाल यांनी जाहिरात का हटवली याचं खरं कारण सांगितलं. त्यांनी लिहिलं, “आमच्या काही स्टोअर्समध्ये काही घटना झाल्यानं आणि परिसरात परिस्थिती चिघळल्यामुळे आमच्या ग्राऊंड स्टाफसाठी असुरक्षित वातावरण निर्माण झाल्यानंतर हा व्हिडीओ तातडीने हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या क्षणी आमचे कर्मचारी आणि स्टोअर्स सुरक्षित असणं ही आमची पहिली जबाबदारी होती. माझ्या कोणत्याही कर्मचाऱ्याची हानी होणं, हे मला कधीच मान्य नसेल.”
नेमकं प्रकरण काय?
क्रिती सेनॉननं ‘जीवा’ कंपनीची रक्षाबंधनानिमित्त जाहिरात केली होती. त्यामध्ये तिनं श्वान हासुद्धा घरातील एक महत्त्वाचा सदस्य असून, त्याला खास राखी बांधली होती. जीवा कंपनीनं श्वानांसाठी राख्यांचं खास कलेक्शन लॉंच केलं होतं. मात्र, या जाहिरातीमध्ये क्रितीनं रिव्हिलिंग कपडे परिधान केल्यामुळे तिच्यावर टीका करण्यात आली. अगदी ‘जीवा’च्या काही स्टोअर्समध्ये काहींनी हा हिंदू सणाचा अपमान असल्याचं म्हणत आक्रमक भूमिका घेतली होती.
