Kriti Sanon Giva Jewellery Advertisement : बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनच्या GIVA ब्रँडच्या रक्षाबंधन जाहिरातीवरून वाद निर्माण झाल्यानंतर ती कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंग झाल्यानंतर ‘GIVA ज्वेलरी’ने ती जाहिरात काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावरून क्रिती सेनॉनच्या जाहिरातीचा व्हिडीओ डिलीट करण्यात आला आहे. क्रिती सेनॉनने सणाच्या वेळी परिधान केलेल्या कपड्यांवरून वाद निर्माण झाला होता. खासदार कंगना रणौत यांनीही यावर टीका केल्यानंतर अखेर क्रितीची जाहिरात हटवण्यात आली आहे.

क्रिती सेनॉनच्या जाहिरातीवरून गदारोळ झाल्यानंतर ‘जीवा’ या ज्वेलरी ब्रॅण्डने ती डिलीट करण्याचा निर्णय घेतला. तसेच झालेल्या या वादावर पोस्ट शेअर करीत भूमिका मांडली आहे. ‘जीवा’ या ब्रँडने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं, “भारतीय संस्कृती, परंपरा आणि सणांविषयी आपल्या मनात खूप आदर आणि सन्मान आहे. एक ब्रँड म्हणून आम्ही संपूर्ण कुटुंबाबरोबर आनंदाचे क्षण साजरे करण्यावर नेहमीच भर दिला असून, यावेळी हा आनंद पाळीव प्राण्यांबरोबर साजरा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आमच्या अलीकडच्या एका जाहिरातीमुळे समाजातील काही घटकांच्या भावना अनवधानाने दुखावल्या गेल्या; पण आमचा तसा कोणताही हेतू नव्हता.”

GIVAची जाहिरात सर्व माध्यमांतून मागे घेण्याचा निर्णय

पुढे त्यांनी लिहिलं, “प्रत्येकाच्या भावनांचा आदर करीत आम्ही ती जाहिरात सर्व माध्यमांतून मागे घेतली आहे. या सणासुदीच्या काळात तुम्हाला खूप खूप प्रेम आणि सकारात्मकता मिळो, हीच सदिच्छा.”

क्रितीची ती वादग्रस्त जाहिरात डिलीट

क्रिती सेनॉनने ‘जीवा’ कंपनीच्या रक्षाबंधनाच्या जाहिरातीमध्ये ब्रालेट स्टाईल ब्लाऊज आणि त्यावर केप असा आऊटफिट स्टाईल केला होता. रिव्हलिंग अशा कपड्यांवर खासदार कंगना रणौत यांनी आक्षेप घेत टीका केली होती. भावाला बिकिनी किंवा अंतर्वस्त्रांमध्ये राखी कोण बांधतं, असा प्रश्न विचारत कंगना रणौत यांनी क्रितीच्या जाहिरातीवर टीका केली होती. त्यावर क्रितीने तिच्या कपड्यांचे समर्थन करीत महिलांना काय कपडे घालायचे हे कधी थांबवणार, असे परखड उत्तर दिले होते. पण, आता क्रितीच्या या वादग्रस्त जाहिरातीचा विषय संपला आहे. क्रितीची ती वादग्रस्त जाहिरात डिलीट करण्यात आली आहे.

काय म्हणाल्या होत्या कंगना रणौत?

कंगना यांनी इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये क्रिती सेनॉनचे थेट नाव न घेता, जाहिरातीतील कपड्यांवरून भाष्य केलं होतं. त्यांनी लिहिलेलं, “महिलांसाठी हा खूप चांगला काळ आहे. आपल्या कपाटात वेगवेगळ्या कपड्यांचे अनेक पर्याय आहेत. आजची महिला ही जागतिक महिला आहे. कॉकटेल ड्रेसेसपासून ते लेहंगा चोळी, जीन्स ते साडी आणि बिकिनीपासून ते सलवार-कमीजपर्यंतचे अनेक पर्याय आज उपलब्ध असताना, तुम्ही तुमच्या भावाला बिकिनी किंवा अंतर्वस्त्रांमध्ये राखी का बांधाल? तुमचे इतर स्टायलिंगचे पर्याय कुठे गेले? ही जाहिरात हेतुपूर्वक विचित्र आणि संशयास्पद वाटत आहे.”