Kriti Sanon on Bollywood Nepotism : बॉलीवूडची लोकप्रिय व स्टायलिश अभिनेत्री क्रिती सेनॉन हिने अभिनयाच्या जोरावर सिनेविश्वामध्ये स्वतंत्र ओळख निर्माण केली. बॉलीवूडची कोणतीही पार्श्वभूमी नसताना क्रितीने कलेमध्ये सातत्य दाखवीत एक दशक प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. हिरोपंती या चित्रपटातून टायगर श्रॉफसह बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या क्रितीला २०२३ मध्ये राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये क्रिती सेनॉन हिने राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतरच्या भावना आणि बॉलीवूडमध्ये आजही असलेले घराणेशाही यांवर परखड भाष्य केले.
‘राष्ट्रीय पुरस्कार’ हा सर्वात गौरवशाली क्षण – क्रिती
अभिनेत्री क्रिती सेनॉन हिला मीमी या चित्रपटासाठी २०२३ साली सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. GQ ला दिलेल्या एका मुलाखतीत हा क्षण क्रितीसाठी अत्यंत अभिमानाचा आणि करिअरमधील सर्वांत सुखद अनुभव देणारा असल्याचे तिने सांगितले. क्रिती सेनॉन म्हणाली की, माझ्या करिअरमधील सर्वांत महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे ‘मीमी’ आणि त्याला मिळालेले अमाप प्रेम. कारण- हा असा पहिलाच प्रकल्प होता, ज्याची संपूर्ण जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतली होती. आम्ही कोरोना महामारीच्या अत्यंत अनिश्चित काळातून जात होतो. चित्रपट मुळात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता; परंतु त्याऐवजी तो ओटीटीवर प्रदर्शित झाला. मात्र, चित्रपटाला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले आणि प्रमुख भूमिकेसाठी मला ‘राष्ट्रीय पुरस्कार’ मिळाला. हा माझ्या कारकिर्दीतील सर्वांत गौरवशाली क्षणांपैकी एक ठरला, अशा भावना क्रिती सेनॉन हिने व्यक्त केल्या.
स्टार किड्सना संधी मिळाल्याची खंत
क्रिती सेनॉन हिचे बॉलीवूडशी संबंध नव्हते. ती बाहेरून आल्यामुळे करिअरच्या सुरुवातीच्या काळात अनेक समस्यांना तोंड दिले. आजही बॉलीवूडमध्ये नेपोटिझमचे वर्चस्व असून, त्यामुळे माझ्या अनेक संधी वाया गेल्या असल्याची खंत क्रितीने व्यक्त केली. क्रिती सेनॉन म्हणाली, मीमी चित्रपटापूर्वी मला खूप मनस्ताप झाला. कारण- मला माहीत होते की, माझ्यामध्ये काहीतरी जास्त करण्याची क्षमता आहे; पण मला संधी कमी मिळत होत्या. अशा अनेक भूमिका होत्या, जिथे माझी बोलणी अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहचली होती; पण त्या संधी स्टार किड्सना मिळाल्या. मात्र, ही गोष्ट माझ्या कंट्रोलमध्ये नव्हती. जेव्हा तुमची चित्रपटसृष्टीची पार्श्वभूमी नसते, तेव्हा तुम्हाला मोठ्या प्रमाणातील अनिश्चिततेचा सामना करावा लागतो, अशी कबुली क्रिती सेनॉन हिने दिली आहे.
महिला कलाकारांबाबत आजही विषमता
चित्रपटसृष्टीमधील यश हे अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर हळूहळू मिळत जाते. मी अधिक जाणीवपूर्वक निवड करीत जोखीम स्वीकारली. मी प्रत्येक संधी स्वतःच्या मेहनतीने मिळवली आहे; मला काहीही आयते मिळालेले नाही, असे मत क्रितीने व्यक्त केले. त्याचबरोबर बॉलीवूडमध्ये पुरुषप्रधान पद्धत असून, अभिनेत्यांना अभिनेत्रींपेक्षा अधिक मानधन दिले जाते. महिला कलाकारांना आजही विषमतेचा सामना करावा लागतो, असे क्रितीने सांगितले.
निर्मात्यांचा मुख्य अभिनेत्यावरच खर्च
क्रिती म्हणाली, जेव्हा निर्मात्यांना खर्चात कपात करायची असते, तेव्हा ते अनेकदा मुख्य अभिनेत्रीच्या मानधनाबाबत वाद घालून ते कमी करण्याचा प्रयत्न करतात. चित्रपटाच्या एकूण बजेटचा मोठा हिस्सा हा मुख्य अभिनेत्यावरच खर्च झालेला असतो. अजूनही चित्रपटसृष्टीत पितृसत्ताक मानसिकता खोलवर रुजलेली असून, समानतेसाठी आम्हाला या व्यवस्थेला सतत आव्हान देत राहावे लागेल, अशी भूमिका क्रिती सेनॉन हिने स्पष्टपणे घेतली.
