Kriti Sanon on Egg Freezing: अभिनेत्री क्रिती सेनॉन काही दिवसांपूर्वीच ‘तेरे इश्क में’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या सिनेमात तिच्याबरोबर धनुष प्रमुख भूमिकेत दिसला होता. या सिनेमातील कलाकारांच्या अभिनयाचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले. सध्या हा सिनेमा नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. ‘तेरे इश्क में’नंतर क्रिती नुकतीच ‘कॉकटेल २’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यामध्ये तिच्याबरोबर रश्मिका मंधाना व शाहिद कपूर प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आता मात्र क्रिती सेनॉन एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने बिजांड गोठवण्याबद्दल(Egg Freezing) वक्तव्य केले. क्रितीने नुकतीच ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने बिजांड गोठवण्याबद्दल पहिल्यांदाच खुलासा केला. तिने हा निर्णय का घेतला, याबद्दलही वक्तव्य केले. ती नेमकं काय म्हणाली याबद्दल जाणून घेऊ..

क्रिती सेनॉन नेमकं काय म्हणाली?

ती म्हणाली, “एक काळ असा होता, जेव्हा मी विचार करत होते की फक्त ठराविक वय झालं म्हणून किंवा समाजामुळे मला लग्न करायचे नाही किंवा मुले होऊ द्यायची नाहीत. लग्न असो किंवा मातृत्व, हे निर्णय तेव्हाच घ्यायला हवेत, जेव्हा मनापासून आपण त्यासाठी तयार असतो. केवळ वेळ निघून चालली आहे किंवा कोणाच्यातरी दबावामुळे असे निर्णय घेऊ नयेत. मला माहिती आहे की प्रत्येकालाच हे परवडू शकत नाही. मी स्वतःला भाग्यवान समजते की मी हा निर्णय घेऊ शकले.”

तिने बिजांड गोठवण्याचा निर्णय कधी घेतला, याबद्दलही तिने खुलासा केला. ती म्हणाली, “‘मिमी’ सिनेमासाठी मला वजन वाढवायचे होते, त्याच काळात मी हा निर्णय घेतला. या प्रक्रियेमुळे शरीर सुजल्यासारखं दिसू शकतं आणि मी त्यावेळी भूमिकेसाठी आधीच वजन वाढवत होते. मी एका व्यक्तीशी याबाबत चर्चा केली होती. त्यानंतर जेव्हा मला चित्रपटासाठी वजन वाढवायला सांगितलं, तेव्हा मी विचार केला की पुढचे दोन महिने माझं कोणतंही शूटिंग नाही आणि मला फक्त वजन वाढवायचं आहे. शिवाय हा चित्रपट सरोगसीवर आधारित असल्यामुळे मला वाटलं, हीच योग्य वेळ आहे आणि मी तो निर्णय घेतला.”

ती पुढे म्हणाली, “मी हा निर्णय घेतला याचा मला आनंद आहे. माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे निर्णय केवळ वेळ निघून जात आहे म्हणून घेतले जावेत असे मला वाटत नाही. लोक जेव्हा विचारतात, लग्न कधी करणार? तेव्हा त्यांच्या मनातला खरा प्रश्न असतो, मुलं कधी होणार? कारण दुर्दैवाने स्त्रियांच्या शरीराची जैविक रचना तशी असते. एका विशिष्ट वयानंतर नैसर्गिक आणि निरोगी गर्भधारणा होणं अधिक कठीण होतं, तसेच बाळाच्या आरोग्याचाही विचार करावा लागतो, त्यामुळे मला जो निर्णय योग्य वाटला तो मी घेतला. मला ते आर्थिकदृष्ट्या शक्य होतं, म्हणून मी तो पर्याय निवडला.”

दरम्यान, ३५ वर्षीय क्रिती सेनॉन तिच्या रिलेशनशिपमुळे अनेकदा चर्चेत असते. आता ‘कॉकटेल २’नंतर ती कोणत्या सिनेमात दिसणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.