अभिनेत्री क्रिती सेनॉन गेल्या काही दिवसांपासून रक्षाबंधनच्या जाहिरातीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. अखेर GIVA या कंपनीने एक निवेदन देत ही जाहिरात हटवण्याचा निर्णय घेतला आहे. क्रितीने राखी पौर्णिमेच्या जाहिरातीत ज्याप्रकारे कपडे परिधान केले होते, त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. खासदार कंगना रणौत यांनीही क्रितीच्या पोशाखावर टीका केली होती. सोशल मीडियावर सुद्धा तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. क्रिती सेनॉनच्या जाहिरातीवरून गदारोळ झाल्यावर ‘GIVA’ या ब्रँडने अखेर ती जाहिरात डिलीट करण्याचा निर्णय घेतला.

या वादावर क्रितीने सुद्धा प्रतिक्रिया देत एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली होती. “स्त्रियांनी कसे कपडे घालावेत हे सांगणं आपण कधी थांबवणार आहोत?” असा सवाल अभिनेत्रीने तिच्या पोस्टमध्ये उपस्थित केला होता. या संपूर्ण प्रकरणावर सध्या विविध स्तरांतून प्रतिक्रिया येत आहेत.

लोकप्रिय मराठी अभिनेत्री राधिका देशपांडेनेही यासंदर्भात सविस्तर पोस्ट शेअर करत अभिनेत्री क्रिती सेनॉनला चांगलंच सुनावलं आहे.

राधिका देशपांडेची पोस्ट

डिअर क्रीपी,
येत्या २८ तारखेला “रक्षा बंधन” आहे, याची तू अनेकांना आठवण करून दिलीस, त्याबद्दल धन्यवाद. मात्र, हा दिवस तुला बरीच वर्षे लक्षात राहणार याची सोय करून ठेवलीस, अभिनंदन.
तुझी इन्स्टा स्टोरी वाचली म्हणून रक्षाबंधन हा सण का साजरा केला जातो, याची आख्यायिका अनेकांनी वाचली, त्याबद्दलही तुला धन्यवाद. बरंच झालं. आतापर्यंत राहुल “भाऊ”मुळे अनेक लोक विषयाच्या खोलात शिरत होते. आता त्यांच्या “बहिणी”ही ते करण्याची संधी देत आहेत, हे चांगलंच आहे. म्हणजे भावा-बहिणींनी मिळून कितीही मंदिरं पाडली, तरी सनातन संस्कृती काय मरत नाही, हे परत सिद्ध होणार. कारण राखी पौर्णिमेचा दिवस तुझ्यासारखा साजरा कोणी करत नाही गं… (अपवाद वगळता).
आता थोडं तुझ्या कृतीबद्दल बोलूया.
हं… तर तुझ्या इन्स्टा स्टोरी प्रमाणे
१. सणाचं महत्त्व त्या दिवशी घातलेल्या कपड्यांवरून नाही, तर हृदयात असलेल्या भावना आणि परंपरेवर आधारित असतं. अगदी बरोबर! म्हणूनच तर करकचून बांधलेली कंचुकी तू घातलीस. समोर बसलेल्या बॉयफ्रेंडचं नशीब उजळलं. इथे मी भाऊ म्हणणार नाही, कारण जाहिरातीत तू त्याला कुठेही भैय्या किंवा ब्रो म्हटलं नाहीस.

२. तू तुझ्या बहिणीला राखी बांधतेस, कुत्र्याला आधी बांधतेस. त्यामुळे २.० मध्ये आई-वडिलांना आणि नवऱ्यालाही बांधताना आम्हाला दिसलीस, तर आम्ही तुला समजून घेऊ. तसंच, निर्जीव वस्तूंना, जसं की सायकल, कार, यांनाही आपण राखी बांधत आलो आहोतच. पण जे चाललं आहे ते चालू द्यायचं तर ते नाही, आता ते बोर झालं. काहीतरी करून भेसळ करायलाच हवी. विकृती आणून new normal करायलाच हवं. हो की नाही?

३. आणि कपड्यांबद्दल म्हणशील, तर पुरुष मंडळींचं ऐकायचं नसतं. त्यांची सांगण्याची पद्धत चुकते बहुतांश वेळा आणि तीच महत्त्वाची. त्यांच्या भावना थोडीच महत्त्वाच्या असतात! तो अधिकार आपण सर्वांनीच गमावला. आधुनिक आणि प्रगतिशील होण्याच्या ओघात भारतीयांनी चांगलं ते स्वीकारता स्वीकारता वाईटही आत्मसात केलं. आणि तुमच्यासारखे गुळगुळीत आणि मुळमुळीत “भाऊ-बहीण” इतरांच्या मेंदूचा सर्गोटा करण्याच्या मागे आहेतच, अजेंड्यामार्फत.

४. स्वास्थ्य, सुख आणि आयुष्यासाठी आपण प्रार्थना करतोच. मग “मेरा गिफ्ट?” कशाला ते? हा.. जाहिरातीत मागावं लागणार. नाहीतर GIVAचा संस्कृती आणि परंपरा जपत खप कसा वाढेल, नाही का?

आणि हा कुठला जीवा? “होता जिवा म्हणून वाचला शिवा” एवढंच मला माहिती आहे. उद्या म्हणाल, हाच तो जिवा. उद्या तुम्ही काहीही म्हणाल, म्हणून आम्ही एक वेळ ऐकून घेऊ; पण काहीही कराल, म्हणून खपवून घेणार नाही.
“No Bindi No Business.” Please maintain the protocol.
आणि हो, क्षमा कर क्रीती, तुला मी सुरुवातीला क्रीपी म्हणून संबोधलं. पण मला खात्री आहे, तू समजून घेशील, कारण शेवटी भावना महत्त्वाच्या. संस्कृती, परंपरा हे निव्वळ पाळीव शब्द. सणासुदीला भुंकणारे.

दरम्यान, क्रिती सेनॉनने या जाहिरातीत ऑफ-व्हाइट रंगाचा ब्रॅलेट-स्टाइल ब्लाउज, ड्रेप्ड स्कर्ट परिधान केला होता. यावरून तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. भाजपा खासदार कंगना रणौत यांनीही क्रितीवर टीका केली होती. यानंतर क्रिती अन् तिची बहीण नुपूर यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केल्या होत्या. अखेर कंपनीने ही जाहिरात सोशल मीडियावरून हटवली आहे.