क्रिती सेनॉन सध्या तिने केलेल्या ज्वेलरी ब्रँडसाठीच्या तिच्या रक्षाबंधनाच्या जाहिरातीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. जाहिरात व्हायरल झाल्यानंतर तिच्या कपड्यांवरून सोशल मीडियावर अनेकांनी आक्षेप घेतला. तिचा इंडो-वेस्टर्न लूक रक्षाबंधनासारख्या पारंपरिक सणासाठी योग्य नसल्याची टीका करण्यात आली. या जाहिरातीमुळे संस्कृती, परंपरा आणि सणाच्या निमित्ताने कलाकारांनी कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करावेत, यावर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. वाद वाढल्यानंतर क्रितीने स्वत: याबद्दल तिचं मत मांडलं. काहींनी तिला पाठिंबा दिला तर काहींनी तिच्यावर टीका केली अशातच आता अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या आईने यावर त्यांचं मत मांडलं आहे.

प्रियांका चोप्राच्या आई मधू चोप्रा यांनी यावर इतरांपेक्षा थोडं वेगळं मत मांडत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी कोणी कसे कपडे परिधान करायचे हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे याचं समर्थन केलं आहे, मात्र यावेळी त्यांनी कुठे कोणत्या प्रकारचे कपडे घालावे याची जाणीव असणंही गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. मधू चोप्रा नेमकं काय म्हणाल्या जाणून घेऊ.

काही मर्यादा असायला हव्यात – मधू चोप्रा

क्रिती सेनॉनच्या जाहिरातीवरून सुरू झालेल्या वादावर अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या आई मधू चोप्रा यांनी मुंबईत आयोजित ‘वुमन बिल्डिंग सिनेमा टुगेदर’ या कार्यक्रमात बोलताना सांगितलं की, “माझं शरीर, माझी मर्जी हे बरोबर आहे, पण त्यालाही काही मर्यादा असणं गरजेचं आहे. प्रतिष्ठा आणि इतरांच्या मूल्यांचा आदर करणं महत्त्वाचं आहे. आता अशा गोष्टी अशा ठिकाणी करता येऊ शकतात, जिथे त्या सामान्य मानल्या जातात. पण इथे त्या सामान्य नाहीत. माफ करा, पण हे सांगणं गरजेचं आहे.”

प्रियंका चोप्रा कामासाठी अशा प्रकारचे कपडे परिधान करते, याबद्दल बोलताना मधू चोप्रा म्हणाल्या, “माझी मुलंही कामासाठी आणि त्यांना आवडतात म्हणून असे कपडे घालतात. पण माझं असंही मत आहे की, प्रसंगानुसार त्यांचा लूक सौंदर्यपूर्ण आणि योग्य दिसायला हवा. जर तो तसा दिसत नसेल, तर टीका होणारच.”

क्रिती सेनॉनने ट्रोलर्सना दिलं प्रत्युत्तर

जाहिरातीतील कपड्यांवरुन टीका झाल्यानंतर क्रिती सेनॉनने तिच्या कपड्यांची निवड आणि जाहिरातीचा संदेश याबद्दल प्रतिक्रिया देत इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केली होती. ती म्हणाली, “दुसऱ्या एखाद्या महिलेने काय परिधान करायचं हे पाहून तुम्ही इतके अस्वस्थ होता. आदरपूर्वक भावनेने सांगते, स्वतःमध्ये बदल घडवा. जिच्या हातून राखी बांधली गेली ती व्यक्ती मीच आहे आणि मला याबद्दल काहीच समस्या नसेल, तर तुम्हाला का आहे? सणांचं महत्त्व तुम्ही कोणते कपडे घालता यात नसतं, तर परंपरेशी जोडलेल्या भावना आणि त्यामागचा अर्थ यात असतं.”