Kriti Sanon Raksha Bandhan Ad Trolled: बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन ही सध्या तिच्या रक्षाबंधनच्या एका जाहिरातीमुळे चर्चेत आली आहे. रक्षाबंधनानिमित्त एका दागिन्यांच्या ब्रँडसाठी क्रितीने जाहिरात केली असून यामुळे तिच्यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. ही जाहिरात आणि त्यातील क्रितीचा ड्रेस नेटकऱ्यांच्या पसंतीस न उतरल्यामुळे क्रिती सेनॉनला ट्रोल केलं जात आहे. अशा प्रकारच्या जाहिरातीतून हिंदू सणांचा अपमान केला जात असल्याचा आरोपही नेटकऱ्यांनी केला आहे.
क्रिती सेनॉनच्या रक्षाबंधनानिमित्त तयार करण्यात आलेल्या जाहिरातीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये क्रिती सेनॉनच्या लूकने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या नात्यातील पवित्र बंधनाचा सण असून यावेळी पारंपरिक कपडे परिधान केले जातात. पण, या जाहिरातीमध्ये क्रितीने इंडो-वेस्टर्न असलेला आउटफिट स्टाइल केला आहे.
क्रितीचा ब्रालेट स्टाइल ब्लाऊज आणि केप असलेला ड्रेस
या जाहिरातीत क्रितीने ऑफ-व्हाइट रंगाचा ब्रालेट स्टाइल ब्लाऊज परिधान केला असून त्यावर केप आणि ड्रेप केलेला स्कर्ट परिधान केला आहे. पारंपरिक सणाच्या लूकला इंडो-वेस्टर्न टच देण्याचा प्रयत्न केला असला तरी तिचे हे कपडे नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले नाहीत. रक्षाबंधनाच्या जाहिरातीसाठी असे कपडे बरोबर आहेत का, असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
क्रिती सेनॉनने श्वानाला बांधली राखी
याचबरोबर जाहिरातीमध्ये दाखवण्यात आलेल्या श्वानावरून चर्चा रंगली. क्रिती सेनॉन ही एका श्वानाला राखी बांधताना दिसून येत आहे. तो तिच्यावर भुंकताना दाखवण्यात आला असून भावाआधी ती श्वानाला राखी बांधत असल्याचे दाखवण्यात आले आहे. कुटुंबाबरोबर रक्षाबंधन साजरे करत असताना श्वानांविषयी असलेले प्रेम आणि श्वानही घरातील एक सदस्य असल्याचा जाहिरातीचा उद्देश असला तरी काही नेटकऱ्यांना हे आवडलेले नाही. काही नेटकऱ्यांनी आक्षेप घेत प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एफआयआर (FIR) दाखल करण्याची नेटकऱ्यांची मागणी
क्रिती सेनॉनच्या या जाहिरातीवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. एका नेटकऱ्यानं लिहिलं, “अत्यंत हीन दर्जाची ही जाहिरात किती आक्षेपार्ह आहे, हे लक्षात येतंय का? अश्लील कपडे, यामध्ये भारतीय परंपरेचा लवलेशही नाही आणि चक्क श्वानाला राखी? श्वान हेसुद्धा नक्कीच मौल्यवान जीव आहे, पण याचा अर्थ असा नाही की ते इथं पण चांगलं वाटेल. अत्यंत घृणास्पद, तुमच्या विरोधात लवकरच एफआयआर (FIR) दाखल करणार आहोत,” तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं, “आरतीचं ताट कुठं आहे? हे कसले कपडे घातले आहेत? हा तर सणाचा अनादर केलाय,” आणखी एका नेटकऱ्याने संताप व्यक्त करत लिहिलं, “फक्त काही पैशांसाठी आमच्या हिंदू धर्माचा सण खराब करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला…? असे कपडे घालून तुम्ही आमच्या मुलांना काय मेसेज देत आहात…तुम्हाला थोडीतरी लाज वाटतीये का?”
