Kriti Sanon Raksha Bandhan Post : रक्षाबंधनाच्या वादग्रस्त जाहिरातीमुळे क्रिती सेनॉन चर्चेत आली. ‘जीवा’ कंपनीच्या या जाहिरातीमध्ये तिने परिधान केलेल्या कपड्यांवरुन क्रितीला ट्रोल करण्यात आले. यावरुन खासदार कंगना रणौत यांनीही टीका केल्यानंतर कंपनीने जाहिरात हटवली. यानंतर आता रक्षाबंधनानिमित्त क्रितीने पोस्ट शेअर करत ट्रोल करणाऱ्यांना टोला लगावला आहे.
क्रिती सेनॉन ही दरवर्षी तिची बहीण नुपूर सेनॉनबरोबर रक्षाबंधन साजरा करत असते. यापूर्वीही त्यांनी एकमेकींना राखी बांधल्याचे फोटो शेअर केले होते. मात्र काही दिवसांपासून क्रितीच्या जाहिरातीवरुन वाद सुरू असून तिने या जाहिरातीमध्ये परिधान केलेल्या कपड्यांमुळे तिला ट्रोल करण्यात आले. यानंतर तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत, राखीसाठी ‘योग्य’ पोशाख कोणता असावा यावरून सुरू असलेल्या वादावर अप्रत्यक्षपणे प्रतिक्रिया दिली आहे.
काय आहे क्रिती सेनॉनची पोस्ट?
क्रितीने इन्स्टाग्रामवर बहीण नुपूरबरोबर फोटो शेअर केला आहे. यामध्ये दोघींच्या हातावर राखी असून त्यांनी एकमेकींचे हात धरले आहेत. बहीण-भावाच्या प्रेमाचा हा सण त्यांनी बहिणी म्हणून साजरा केला असून एकमेकींबद्दलचे प्रेम व्यक्त केले आहे. ही पोस्ट शेअर करताना क्रितीने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले आहे. क्रितीने लिहिलं, “राखी फॅशन कमिटीची अजूनही चर्चा सुरूच आहे; पण आम्ही मात्र खरंच ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्यावर लक्ष देतोय, सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!”
क्रितीच्या रक्षाबंधनाच्या जाहिरातीवरुन वाद
क्रिती सेनॉन नुकतीच एका ज्वेलरी ब्रँडच्या रक्षाबंधनच्या जाहिरातीत दिसली होती. या जाहिरातीत सण साजरा करताना तिने ऑफ-व्हाइट रंगाचा ब्रालेट-स्टाईल ब्लाउज, त्यावर केप आणि ड्रेप्ड स्कर्ट परिधान केला होता. तिचा हा पोशाख रक्षाबंधन साठी शोभत नाही असं म्हणत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. यावर कंगना रणौत यांनी प्रतिक्रिया देत ‘तुम्ही तुमच्या भावाला बिकिनी किंवा अंतर्वस्त्रांमध्ये राखी बांधाल का? तुमचे इतर स्टायलिंगचे पर्याय कुठे गेले?’ असा प्रश्न विचारला होता. यामुळे क्रिती सेनॉनची जाहिरात चर्चेत आली होती. यावर क्रितीने, ‘मुलींना काय कपडे घालायचे हे सांगणं कधी थांबवणार आहात?’ असा प्रतिप्रश्न करत सडेतोड उत्तर दिलं होतं.
नुपूर सेनॉनने बहिणीसाठी केलेली पोस्ट
क्रिती सेनॉनला रक्षाबंधनानिमित्त केलेल्या एका जाहिरातीतील कपड्यावरून ट्रोल करण्यात आल्याने तिची बहीण नुपूरने बहिणीसाठी पोस्ट शेअर केली होती. नुपूरनं लिहिलेलं, “फक्त कल्पना करा की एक स्त्री काय परिधान करते त्याबाबत दुसऱ्या स्त्रीला एवढा त्रास होतो आहे. तुम्ही प्रगती करा पण महिलांचा आदरही करा. शिवाय मला एक प्रश्न आहे की ती ज्याला राखी बांधते आहे त्याला काही प्रश्न नाही. जिने कपडे घातले आहेत तिला काही प्रश्न नाही मग तुम्हाला का इतका त्रास होतो आहे?”
दरम्यान, या संपूर्ण वादानंतर ‘जीवा’ या कंपनीने दिलगिरी व्यक्त करत क्रिती सेनॉनची जाहिरात सर्व माध्यमातून हटवण्याचा निर्णय घेतला.
