Kriti Sanon And Vicky Kaushal on Hrithik Roshan: बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन आणि अभिनेता विकी कौशल यांनी नुकतीच ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ या शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये त्यांनी त्यांच्या करिअरमधील अनेक किस्से सांगितले. तसेच, त्यांचे अनुभवही सांगितले.
याच शोमध्ये क्रिती आणि विकीने लोकप्रिय अभिनेता हृतिक रोशनबद्दल वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यांची चर्चा होताना दिसत आहे. २०१४ मध्ये किर्ती सेनॉनने हिरोपंती या चित्रपटातून तिच्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात केली. या चित्रपटात टायगर श्रॉफ प्रमुख भूमिकेत होता. याचदरम्यान, हृतिक रोशनने रात्री २ वाजता फोन केला होता.
“हृतिक रोशन मला…”
क्रिती हा किस्सा सांगत म्हणाली, “माझ्या खोलीत एकाच व्यक्तीचे पोस्टर होते. तो म्हणजे हृतिक रोशन. जेव्हा हिरोपंती चित्रपट प्रदर्शित झाला. त्यावेळी मला माहित नव्हते की टायगरने खास हृतिकसाठी चित्रपटाचे स्क्रिनिंग ठेवले आहे. मी झोपले होते.रात्री २ वाजता माझा फोन वाजला. मी पाहिले तर अनोळखी नंबर होता. मी ट्रूकॉलरवर पाहिले तर तो नंबर हृतिक रोशनचा आहे अशी माहिती मिळाली. त्याने मला रात्री दोन वाजता फोन केला होता. हृतिक रोशन मला फोन करत आहे, हे समजून घेण्यासच मला काही वेळ गेला. मी सकाळ होण्याची वाट पाहिली आणि त्याला परत फोन केला.”
विकी कौशल हृतिक रोशनबद्दल म्हणाला, “मी हृतिक रोशनचा खूप मोठा चाहता होतो आणि आजही आहे. जेव्हा त्याचा पहिला चित्रपट ‘कहो ना प्यार है’ आला तेव्हा देशातील प्रत्येकजण त्याच्यासाठी वेडा झाला होता. मला कळले की माझे बाबा त्याच्याबरोबर काम करत आहेत. मी तोपर्यंत त्यांना म्हणले नव्हते मला त्याला भेटायचे आहे. चित्रपटांच्या सेटवर काय होते, कशा प्रकारे गोष्टी केल्या जातात, याबद्दल मला काहीही माहित नव्हते.”
“मी दहावीत होतो, मला अजूनही आठवतं की मी माझ्या वडिलांकडे गेलो आणि त्यांना म्हणालो की मी त्यांना भेटू शकतो का? त्यावर ते मला म्हणाले की तो अशाच मुलांना भेटतो ज्यांना एक पल का जीना या गाण्यावर डान्स करता येतो. त्याला भेटायचे म्हणून मी तीन दिवस सराव केला. मी विचार करत होतो की जेव्हा हृतिक रोशन मला भेटतील तेव्हा मी त्यांना तो डान्स करून दाखवेन आणि त्यांना तो आवडेल.जेव्हा मी त्याला भेटलो तेव्हा त्याने खूप प्रेमाने स्वागत केले. मी त्याच्याबरोबर फोटोदेखील काढले होते.”
