Kriti Sanon Viral Raksha Bandhan Advertise: सिनेमात काम करणारे कलाकार हे विविध जाहिरातींतसुद्धा दिसतात. बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन काही दिवसांपूर्वी रक्षाबंधनच्या एका जाहिरातीत दिसली होती. या जाहिरातीत तिच्या कपड्यांवरून तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले होते.
क्रितीने इंडो वेस्टर्न कपडे परिधान केले होते. तिने ब्रॅलेट-स्टाइल ब्लाउज, ड्रेप्ड स्कर्ट परिधान केला होता. जाहिरातीत दाखवल्याप्रमाणे क्रिती तिच्या भावाला व पाळीव श्वानाला राखी बांधते, त्यावरून मोठ्या प्रमाणात वाद झाला होता.
क्रिती सेनॉन काय म्हणाली?
सोशल मीडियावर क्रितीवर टीका करण्यात आली होती. पारंपरिक सणावेळी अशा पद्धतीचे कपडे घातल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. अनेक कलाकारांनीही यावर मत मांडले होते. आता हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. याचे कारण म्हणजे स्वत: क्रितीनेच यावर वक्तव्य केले आहे.

क्रिती सेनॉनने नुकतीच करीना कपूरच्या व्हॉट वुमन वॉन्ट (What Women Want Season 6) च्या सहाव्या सीझनमध्ये हजेरी लावली होती. यावेळी करीनाशी बोलताना ती म्हणाली, “माझा ब्लाऊज प्राइम-टाइम न्यूजमधल्या सहा जणांच्या पॅनेलच्या चर्चेचा विषय झाला, यावर मला विश्वासच बसत नव्हता.” क्रितीचे बोलणे ऐकून करीना होकार देत म्हणाली, “मला माहीत आहे.”

जेव्हा क्रितीला कपड्यांवरून ट्रोल केले होते, त्यावेळी तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत उत्तर दिले होते. महिलांना आजही कपड्यांवरून का जज केलं जातं, असा प्रश्न तिने विचारला होता. तिने लिहिले होते, “स्त्रियांनी काय परिधान करावं हे ठरवणं आपण कधी थांबवणार आहोत? गेल्या काही वर्षांत पारंपरिक फॅशनमध्ये खूप बदल झाले आहेत. तरीही एखादी महिला आपल्या संस्कृतीचा किती आदर करते हे अजूनही तिच्या कपड्यांवरूनच ठरवलं जातं. संस्कृती आणि परंपरा तिने घातलेल्या ब्लाऊजच्या नेकलाईवर नाही तर तिच्या मनात असतात.”

याबरोबरच क्रितीने यासंदर्भात अनेक पोस्ट शेअर केल्या होत्या. दरम्यान, करीना कपूर खानच्या या शोमध्ये अनेक लोकप्रिय अभिनेत्री हजेरी लावताना दिसतात.
