Kriti Sanon Womens safety post on Daughters Day : ‘कन्या दिनाच्या निमित्ताने बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहीत क्रितीने महिला सुरेक्षाच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामध्ये मुलींना तिच्या सुरक्षेसाठी लाइव्ह लोकेशन शेअर करावे लागते किंवा तिच्याबरोबर ‘पेपर स्प्रे’ ठेवावा लागतो, अशी समाजातील परिस्थिती मांडून महिला सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे. क्रिती सेनॉनच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले असून, नेटकऱ्यांनी क्रितीला पाठिंबा दिला आहे.
कन्या दिनानिमित्त (Daughters Day) इन्स्टाग्रामवर पोस्ट करत क्रितीने लिहिले, “अशी कल्पना करा की, तुमची मुलगी घरी फोन करून सांगते की, काही मुलं तिचा पाठलाग करीत आहेत. ती रात्री एकटीच घरी चालली आहे आणि सतत मागे वळून पाहत आहे. कल्पना करा की, घरी पोहोचण्याआधीच तिचा फोन बंद पडलाय आणि आता या गोष्टीचा नीट विचार करा.”
भीतीलाच आपल्या जगण्याचा एक भाग बनवलंय – क्रिती
पुढे तिने लिहिले, “लाइव्ह लोकेशन’ शेअर करण्यापासून ते अनेकदा स्वतःबरोबर ‘पेपर स्प्रे’ बाळगण्यापर्यंत, चालत जाण्याऐवजी टॅक्सीतून जाण्यास प्राधान्य देण्यापासून ते सुरक्षित वाटण्यासाठी सतत फोनवर बोलत राहण्यापर्यंत- आपण भीतीलाच आपल्या जगण्याचा एक सामान्य भाग बनवून टाकले आहे.”

पुढे क्रितीने लिहिले, “ज्या दिवशी एखादी मुलगी रात्री एकटी घरी चालत जाऊ शकेल, अंधार पडल्यानंतरही बागेत निर्धास्तपणे बसू शकेल, तिला हवे ते कपडे तिला घालता येतील, कोणतीही भीती न बाळगता, सार्वजनिक वाहतुकीनं प्रवास करता येईल आणि सातत्यानं शारीरिक अत्याचाराचा कोणताही विचार न करता, सार्वजनिक ठिकाणी मोकळेपणाने वावरता येईल… तोच दिवस आपण खऱ्या अर्थानं कन्या दिन (डॉटर्स डे) म्हणून साजरा करायला हवा.”
पुढे तिने लिहिले की, आतापर्यंत ज्या प्रत्येक मुलीनं कधीतरी घरी फोन करून सांगितले, मी व्यवस्थित पोहोचले. त्यानंतर अशी वेळ यावी की, हे घरी सांगण्याची गरज राहणार नाही. मुलींना असं सुरक्षित व निर्भय जग मिळायला हवं आणि त्यांना असं जग देण्याची जबाबदारीही आपलीच आहे.

क्रिती सेनॉनच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करीत तिला पाठिंबा दिला आहे. एका नेटकऱ्याने लिहिले की, ही फक्त एक पोस्ट नाही, तर ही प्रत्येक मुलीच्या मनातील इच्छा आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, तू एक एक लिहिलेला शब्द दुर्दैवानं खरा आहे, सध्या अशीच परिस्थिती आहे. आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “क्रितीची ही पोस्ट तिला ट्रोल करणाऱ्यांपेक्षा जास्त व्हायरल झाली पाहिजे.” आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “खूप सुंदर शब्द आणि खूप सुंदर पोस्ट.”
