Kritika Kamra and Gaurav Kapur Wedding : अभिनेत्री कृतिका कामरा आणि प्रसिद्ध टेलिव्हिजन प्रेझेंटर व क्रिकेट कॉमेंटेटर गौरव कपूर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. हे दोघेही ११ मार्च २०२६ रोजी गौरवच्या मुंबईतील घरी एका अत्यंत खासगी सोहळ्यात, कुटुंबियांच्या उपस्थितीत नोंदणी पद्धतीने लग्न करणार आहेत. त्यानंतर दोघांच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा होईल.

कृतिका कामरा व गौरव कपूर यांचे रिसेप्शन १२ मार्च रोजी होईल. हे रिसेप्शन साधेपणाने होईल. लग्न व रिसेप्शनमध्ये अवाढव्य खर्च न करता तो साधेपणाने करायचा निर्णय कृतिका व गौरवने घेतला आहे. या सोहळ्याला चित्रपट इंडस्ट्री आणि क्रिकेट जगतातील त्यांचे मित्र, कुटुंबीय आणि सहकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

गौरव व कृतिकाच्या एका जवळच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, “कृतिका आणि गौरव यांना लग्नात दिखाऊपणा नको आहे. सोहळा खासगी असेल. प्रेम व आपुलकीने भरलेला असेल. दोघेही परंपरांचा आदर करतात. पण लग्न साध्या पद्धतीने त्यांच्या जवळच्या लोकांबरोबर करायची त्यांची इच्छा आहे. तर १२ तारखेला मुंबईत होणाऱ्या रिसेप्शन पार्टीत सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळेल.

कृतिका कामराने दिली प्रेमाची कबुली

३७ वर्षांच्या कृतिका कामराने डिसेंबर महिन्यात गौरवबरोबरचे फोटो शेअर करून प्रेमाची कबुली दिली होती. ३७ वर्षांच्या कृतिकाने “breakfast with…” एवढंच कॅप्शन या फोटोंना दिलं होतं. पहिला फोटो कृतिका व गौरवचा कोलाज होता. दुसऱ्यामध्ये गौरव ब्रेकफास्ट करताना, तर कृतिका त्याचा फोटो काढत होती. तिसरा फोटो गौरवचा होता. तसेच शेवटच्या व्हिडीओत दोघांच्याही हातातील कॉफी मगवर bubby’s असं लिहिलं होतं.

घटस्फोटित आहे गौरव कपूर

४४ वर्षांचा गौरव कपूर घटस्फोटित आहे. त्याचं पहिलं लग्न अभिनेत्री आणि मॉडेल किरत भट्टलशी झालं होतं. काही वर्षे डेट केल्यानंतर त्यांनी २०१४ साली लग्न केलं होतं. २०२१ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. तर, कृतिका कामरा काही वर्षांपूर्वी करण कुंद्राबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. २०१२ मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले.

कोण आहे गौरव कपूर?

गौरव कपूर हा मूळचा दिल्लीचा आहे. तो क्रिकेट आणि टीव्ही प्रेझेंटर व अभिनेता आहे. तो इंडियन प्रीमियर लीग प्री-मॅच शो, टी-२० सामन्यांचे कव्हरेज आणि त्याच्या लोकप्रिय यूट्यूब शो ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स’ साठी ओळखला जातो. गौरव कपूरने २००३ मध्ये ‘डरना मना है’ सिनेमातून अभिनयात पदार्पण केलं. मग त्याने ‘श्श्श’, ‘अगली और पगली’, ‘ए वेन्सडे’, ‘क्विक गन मुरुगन’, ‘चला मुसद्दी ऑफिस ऑफिस’ व ‘काय पो छे!’ हे चित्रपट केले.

कृतिका कामराचे करिअर

कृतिकाने २००७ मध्ये ‘यहाँ के हम सिकंदर’ मधून अभिनय सुरू केला. २००९ मध्ये ‘कितनी मोहब्बत है’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. त्यानंतर तिने ‘प्यार का बंधन’, ‘कितनी मोहब्बत है २’ आणि ‘कुछ तो लोग कहेंगे’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले.

२०१८ मध्ये ‘मित्रों’ या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. मग तिने २०२१ मध्ये ती ‘तांडव’ सीरिज केली. नंतर तिने ‘कोण बनेगी शिखरवटी’, ‘हश हश’, ‘भीड’, ‘बंबई मेरी जान’, ‘ग्यारह ग्यारह’ आणि अलीकडेच ‘द ग्रेट शमसुद्दीन फॅमिली’मध्ये विविध भूमिका साकारल्या.