Kritika Kamra and Gaurav Kapur Wedding : हिंदी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री कृतिका कामरा आणि प्रसिद्ध टेलिव्हिजन प्रेझेंटर व क्रिकेट कॉमेंटेटर गौरव कपूर लग्नबंधनात अडकले आहेत. या दोघांचा विवाहसोहळा ११ मार्चला वांद्रे येथे राहत्या घरी अगदी साध्या पद्धतीने आणि मोजक्या लोकांच्या उपस्थित पार पडला. कृतिका-गौरवच्या लग्नाला त्यांचे काही जवळचे मित्र आणि नातेवाईक उपस्थित होते.

कृतिका कामरा आणि गौरव कपूर यांचा विवाहसोहळा नोंदणीकृत पद्धतीने पार पडला आहे. लग्नसोहळ्यात अभिनेत्रीने लाल रंगाची सुंदर चंदेरी सिल्क साडी नेसली होती. ही साडी कृतिकाच्या स्वत:च्या ‘सिन्नाबार’ ब्रँडची आहे. तर गौरवने यावेळी डिझायनर राघवेंद्र राठोड यांनी डिझाइन केलेला सूट घातला होता. कृतिका-गौरवच्या लग्नसोहळ्याला विरेंद्र सेहवाग, झहीर खान, युवराज सिंह, नेहा धुपिया, अंगद बेदी, पूजा गौर, सोहा अली खान, मलायका अरोरा असे अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.

गौरव कपूरच्या राहत्या घराच्या गच्चीवर सेलिब्रेशनसाठी सुंदर अशी सजावट करण्यात आली होती. याठिकाणी गौरव-कृतिकाने काढलेले सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याबद्दल कृतिका आणि गौरव म्हणाले, “आम्हाला नेहमीच असं वाटायचं की आयुष्यातील खास क्षण आपण फक्त आपल्या आवडत्या लोकांबरोबर शेअर केले पाहिजेत. आम्ही आमच्या आयुष्यातील या नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे. आमचं लग्न मुंबईत घरी, आमच्या कुटुंबासह आणि आमच्या जवळच्या मित्रांसह आम्ही साजरं केलं…याचा खूप आनंद होतोय.”

अभिनेत्री कृतिका कामरा आता ३७ वर्षांची आहे. या जोडप्याने काही महिन्यांपूर्वीच सोशल मीडियावर प्रेमाची कबुली दिली होती.

तर, ४४ वर्षीय गौरव कपूर मूळचा दिल्लीचा आहे. त्याने काही वर्षांपूर्वी सिनेमाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. गौरव क्रिकेट कॉमेंटेटर व अभिनेता म्हणून ओळखला जातो. वैयक्तिक आयुष्यात गौरव घटस्फोटित आहे. त्याचं पहिलं लग्न अभिनेत्री आणि मॉडेल किरत भट्टलशी २०१४ मध्ये झालं होतं. सात वर्षांच्या संसारानंतर या जोडप्याने २०२१ मध्ये विभक्त होण्याचा निर्णय गेतला. किरत भट्टलने आजवर अनेक साऊथ चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. याशिवाय तिने अनेक ट्रॅव्हल शो देखील होस्ट केले आहेत.

तर, कृतिकाने तिच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाची सुरुवात २००७ मध्ये केली होती. ‘कितनी मोहब्बत है’, ‘कुछ तो लोग कहेंगे’ या मालिकांमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. याशिवाय कृतिकाने बॉलीवूड चित्रपटांमध्येही काम केलेलं आहे. दरम्यान, ११ मार्चला घरच्या घरी विवाहसोहळा पार पडल्यावर १२ मार्चला गौरव-कृतिकाने त्यांच्या लग्नाचं रिसेप्शन आयोजित केलं आहे.