Kamal R Khan Arrested : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारा अभिनेता कमाल आर. खान म्हणजेच केआरके गोळीबार प्रकरणात अडकला आहे. सोशल मीडियावर आपल्या पोस्टमधून बॉलीवूड कलाकारांवर सातत्याने टीका करणाऱ्या केआरकेला मुंबईतील ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमाल आर. खानला आज न्यायालयात हजर केलं जाईल. न्यायालयात केआरकेला पोलीस कोठडीत पाठवलं जाण्याची शक्यता आहे. ओशिवरा गोळीबार प्रकरणात ही अटक झाली आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, कमाल आर. खानचा जबाब नोंदवण्यात आला आहे. चौकशीदरम्यान त्याने गोळीबार त्याच्याच बंदुकीतून झाल्याचे कबूल केले आहे. बंदुक साफ करताना गोळी सुटली, जाणून गोळ्या झाडल्या नसल्याचं त्याने म्हटलंय. आपल्याकडे बंदुकीचा परवाना असल्याचंही त्याने चौकशीत सांगितलं. पोलीस या दाव्याची चौकशी करत आहेत. ओशिवरा पोलिसांनी संशयित बंदुक जप्त केली आहे आणि संबंधित कागदपत्रांची तपासणी केली जात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
ओशिवारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी उशिरा केआरकेला ओशिवारा पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. इथे त्याची सखोल चौकशी करण्यात आली. कागदोपत्री कारवाई पूर्ण झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं. सध्या कमाल आर. खान ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि पुढील तपास सुरू आहे.
नेमकं प्रकरण काय?
ओशिवारा भागातील नालंदा सोसायटीत गोळीबार झाला होता. तपासादरम्यान पोलिसांनी नालंदा सोसायटीमधून दोन गोळ्या सापडल्या. एक गोळी दुसऱ्या मजल्यावर आणि दुसरी चौथ्या मजल्यावर सापडली. यापैकी एक फ्लॅट लेखक-दिग्दर्शकाचा आहे, तर दुसरा फ्लॅट एका मॉडेलचा आहे, अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर ओशिवारा पोलीस स्टेशनमधील १८ जणांच्या टीमसह क्राइम ब्रांचकडून या प्रकरणाचा तपास सुरू होता. सुरुवातीच्या तपासात सीसीटीव्ही फुटेजमध्ये गोळीबारासंदर्भात काहीच पुरावा आढळला नाही. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात फॉरेन्सिक टीमची मदत घेतली. तपासानंतर असं लक्षात आलं की गोळ्या ज्या दिशेने फ्लॅटमध्ये आल्या आहेत, ते पाहता गोळीबार केआरकेच्या बंगल्यातून झाला असावा.
केआरकेला अटक झाली आहे. पण सध्या संपूर्ण प्रकरणाची कागदोपत्री प्रक्रिया सुरू आहे. केआरकेला कोर्टात हजर केल्यावर पोलीस कोठडीची मागणी केली जाऊ शकते. केआरकेने गोळीबार का केला, याची चौकशी पोलीस करत आहेत.
