Krystle D’Souza Sleep Cycle: आपल्या सवयींचा आपल्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. आपण काय खातो, किती वाजता जेवण करतो, आहारात कोणते पदार्थ असतात याबरोबरच आपण पुरेसे पाणी पितो का, आपण वेळेवर झोपतो का, दररोज व्यायाम करतो का अशा अनेक गोष्टींचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो.
अनेकदा कोणत्या सवयी चांगल्या आणि कोणत्या वाईट यांमध्ये अनेकांना संभ्रम असतो. त्यामुळे तज्ज्ञांची मदत घेणे गरजेचे असते. काही कलाकारही त्यांची जीवनशैली, त्यांच्या सवयी, त्यांचा आहार यांबद्दल विविध मुलाखतींमधून खुलासे करत असतात. त्यामुळे त्यांचे आयुष्य कसे असते, ते कसे राहतात याचा चाहत्यांना अंदाज येतो.
आता ‘धुरंधर’फेम अभिनेत्री क्रिस्टल डिसुझाने एका मुलाखतीत तिची जीवनशैली, तसेच तिची दिनचर्या यांबद्दल वक्तव्य केले आहे. ती नेमकं काय म्हणाली आहे, ते जाणून घेऊ…
“मी खूप उशिरा…”
अभिनेत्रीने नुकतीच फिल्टर कॉपीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला विचारले गेले की, तू सकाळी उशिरा उठतेस का? त्यावर अभिनेत्री म्हणाली, “मी खूप उशिरा उठते. मी रोज १२ वाजता उठते. कारण- मी ७ वाजता झोपते. जेव्हा दिवस उजाडायला सुरुवात होते, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येतो, तेव्हा मला झोप येते.”
ती पुढे असेही म्हणाली, “मी एकटी राहते. त्यामुळे मी रात्रभर जागी असते.” त्यावर तिला विचारले गेले की, एकटी राहत असल्यामुळे रात्री तिला भीती वाटते का? त्यावर अभिनेत्री असे म्हणाली, “त्यामुळे रात्रभर मी जागी असते. लोकांशी बोलते.”
आता अशा जीवनशैलीचा आरोग्यावर काय परिणाम होतो, याबद्दल जाणून घेऊ..
डॉ. हरीश चाफळे यांनी अशा दिनचर्येचा आरोग्यावर काय परिणाम होतो, याबद्दल सांगितले. ते सीनियर कन्सल्टंट, चेस्ट फिजिशियन, झोप विकार तज्ज्ञ आहेत.
दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना त्यांनी सांगितले, “दररोज सकाळी ७ ते दुपारी १२ (फक्त ५ तास) अशी झोप घेतल्यास, नंतरच्या काळात झोपेसंबंधित तक्रारी जाणवू शकतात. झोप न लागण्याची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे थकवा येणे, लक्ष केंद्रित करण्यात अडचण आणि मनःस्थितीशी संबंधित समस्या वाढू शकतात. उलट झोपेची वेळ (Reversed Sleep Cycle) शरीराच्या जैविक घड्याळात (Circadian Rhythm) बिघाड निर्माण करते. त्याचा चयापचय क्रियेवर विपरीत परिणाम होतो. रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते (Insulin Resistance) आणि कॉर्टिसोल (Cortisol) व मेलाटोनिन (Melatonin)सारख्या हार्मोन्समध्ये बदल होऊ शकतो.”
(सूचना : हा लेख दी इंडियन एक्स्प्रेसने ज्या तज्ज्ञांशी संवाद साधला, त्या माहितीवर आधारित आहे. कोणतीही दिनचर्या सुरू करण्यापूर्वी, जीवनशैलीचा अवलंब करण्याआधी आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
