Kubbra Sait talks about Nana Patekar : काही दिवसांपूर्वी ‘प्राइम व्हिडीओ’वर प्रदर्शित झालेल्या ‘संकल्प’ या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री कुब्रा सैत एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकली आहे. तिने ‘परवीन’ नावाचे पात्र साकारले आहे. या वेब सीरिजमध्ये ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. कुब्राने नाना पाटेकरांबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला. त्याचबरोबर तिच्या करिअरबद्दलही तिने भाष्य केलं.
‘एबीपी न्यूज’शी बोलताना या भूमिकेसाठी केलेली तयारी आणि सेटवरील अनुभव कुब्राने शेअर केले. पोलिसाच्या भूमिकेच्या तयारीबद्दल बोलताना कुब्रा म्हणाली, “तयारी केवळ कामाच्या वेळीच नाही, तर त्याआधी आणि नंतरही सुरू असते. या सीरिजची स्क्रीप्ट इतकी सुंदर लिहिली आहे आणि सोबतीला इतके चांगले कलाकार व दिग्दर्शक होते की मला जास्त विचार करावा लागला नाही. खरं तर, मी सर्वात जास्त मेहनत हिंदी भाषा शिकण्यावर घेतली, कारण या सीरिजमध्ये अतिशय शुद्ध हिंदीत संवाद आहेत.”
नाना पाटेकर यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता?
कुब्राने या सीरिजच्या निमित्ताने पहिल्यांदाच नाना पाटेकर यांच्याबरोबर काम केलंय. “कामाचा अनुभव खूपच छान होता. ते खूप चांगले आहेत आणि मला त्यांच्याकडून खूप प्रेरणा मिळाली. नाना सर स्वतः आपली स्क्रीप्ट लिहीत बसतात. एकदा का ते सेटवर आले की, जोपर्यंत शूट सुरू असते तोपर्यंत ते आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये जात नाहीत. अशा छोट्या-छोट्या गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत. त्यांची ही पद्धत सर्वांसाठी योग्य आहे, असं मी म्हणणार नाही पण त्यांच्या या पद्धतीतून मी बऱ्याच गोष्टी शिकले,” असं कुब्रा सैतने नमूद केलं.
नाना पाटेकरांबरोबर काम करताना भीती नाही वाटली का?
कुब्रा म्हणाली, “नाही, मला कोणाचीही भीती वाटत नाही. आता तर मी कशालाच घाबरत नाही. ते ज्येष्ठ आहेत म्हणून मी घाबरलं पाहिजे, ही गोष्ट आपल्या मनात असते. ते मला कधीच ओरडले नाही. जर मी आधीच मनात भीती धरली असती आणि योगायोगाने ते ओरडले असते, तर माझ्या मनातली ती भीती खरी ठरली असती. पण तसं काहीच घडलं नाही.”
या भूमिकेसाठी कोणी तुझी प्रेरणा आहे का?
कुब्राने यापूर्वीही पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिका केल्या आहेत. ती म्हणाली, “नाही, मी याआधी दोनदा पोलिसाची भूमिका केली आहे, त्यामुळे मी स्वतःच स्वतःची प्रेरणा आहे. लोक म्हणतात की एकाच प्रकारच्या भूमिका केल्यामुळे ‘टाईपकास्ट’ होण्याचा धोका असतो. पण मला असं वाटत नाही, कारण दोन व्यक्ती किंवा दोन पात्र कधीच सारखी असू शकत नाहीत.”
करिअरमधील चढ-उतारांबद्दल कुब्रा म्हणाली, “मला माझ्या करिअरमध्ये फक्त प्रगतीच दिसली आहे, कोणताही ‘उतार’ जाणवला नाही. अभिनय आणि करिअर हे एका खेळासारखं आहे. कधी तुम्ही मोठी झेप घेता, तर कधी छोटी. प्रत्येक पायरी सारखी नसते, पण मी सतत पुढे जात आहे हे मला नक्की माहीत आहे.”
