‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील एक मैलाचा दगड मानला जातो. १९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना प्रेमाची आणि मैत्रीची एक नवीन व्याख्या शिकवली. करण जोहरचा ‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जकार्तामधील आपल्या भाषणात ‘कुछ कुछ होता है’ या गाण्याचं कौतुक केलं आणि त्याला भारताचं गाणं म्हटलं. चित्रपटाचं हे कौतुक ऐकून करण जोहरलाही खूप आनंद झाला. चला तर मग, या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल जाणून घेऊयात.

‘कुछ कुछ होता है’ सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन

‘कुछ कुछ होता है’ चित्रपटात शाहरुख खान मुख्य हिरो होता. तर काजोल आणि राणी मुखर्जी मुख्य अभिनेत्रींच्या भूमिकेत होत्या. ‘कोईमोई’च्या रिपोर्टनुसार, हा चित्रपट तयार करण्यासाठी १४ कोटी रुपये खर्च आला होता. या चित्रपटाने तब्बल २३४.८६ टक्के नफा कमावला होता. चित्रपटाने पहिल्या दिवशी ८७ लाख रुपयांची कमाई करत ओपनिंग केली होती. तर पहिल्या वीकेंडला चित्रपटाने २.७४ कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने ५.६४ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. हा चित्रपट तब्बल १० आठवडे थिएटरमध्ये सुरू होता.

‘कुछ कुछ होता है’ चित्रपटाने भारतातील बॉक्स ऑफिसवर ४६.८८ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर जगभरात या चित्रपटाने ९१.०९ कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. ‘कुछ कुछ होता है’ नेटफ्लिक्स व प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहे.

‘कुछ कुछ होता है’ची कथा

राहुल आणि अंजली हे कॉलेजमधील चांगले मित्र असतात. अंजली मुलांसारखी राहणारी असते. कॉलेजमध्ये जेव्हा प्रिन्सिपलची मुलगी ‘टीना’ येते, तेव्हा राहुल तिच्या प्रेमात पडतो. याच दरम्यान अंजलीला जाणवतं की तिचंही राहुलवर प्रेम आहे, पण राहुल आणि टीनाचे प्रेम पाहून ती कॉलेज सोडून निघून जाते. राहुल आणि टीनाचे लग्न होते, पण मुलगी ‘अंजली’च्या जन्मानंतर काही दिवसांतच टीनाचा मृत्यू होतो.

टीनाने तिच्या मृत्यूपूर्वी आपल्या मुलीसाठी काही पत्रे लिहिलेली असतात. शेवटच्या पत्रात ती मुलीला तिच्या नावामागची कथा सांगते आणि राहुल-अंजलीला पुन्हा एकत्र आणण्याची जबाबदारी सोपवते. ८ वर्षांची छोटी अंजली आपल्या वडिलांच्या जुन्या मैत्रिणीचा शोध घेते. पण, जेव्हा ती अंजलीला शोधते, तेव्हा अंजलीचे लग्न अमानशी (सलमान खान) ठरलेले असते. शेवटी अनेक ट्विस्टनंतर राहुल आणि अंजली एकत्र येतात.

‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहरने केले होते. हा त्याचा पहिलाच चित्रपट होता. हा चित्रपट १६ ऑक्टोबर १९९८ रोजी प्रदर्शित झाला आणि ब्लॉकबस्टर ठरला होता. याची निर्मिती यश जोहर यांनी केली होती आणि चित्रपटाचा कालावधी २ तास ५७ मिनिटे इतका होता. या चित्रपटातील गाणी खूप गाजली होती. बॉक्स ऑफिस गाजवणाऱ्या या चित्रपटाला अनेक पुरस्कारही मिळाले होते.